कोरोना बरा होतो याचा विश्वास देण्याची गरज - पालकमंत्री

विनोद बेदरकर
Friday, 18 September 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काळजी घेतानाच, लस कधी येईल हे माहिती नसताना अशा काळात नागरिकांमधील कोरोनाची भीती घालविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

 

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काळजी घेतानाच, लस कधी येईल हे माहिती नसताना अशा काळात नागरिकांमधील कोरोनाची भीती घालविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या पुढाकारातून आयुक्तालयात पोलिसांसाठी ३५ खाटांचे स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून, दोन रुग्णवाहिका आहेत. शुक्रवारी (ता. १८) श्री. भुजबळ यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड प्रभारी पोलिस अधीक्षक संदीप घुगे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

आणखी ७२ व्हेंटिलेटर 

भुजबळ म्हणाले, की जिल्ह्याला पुढील आठवड्यात आणखी ७२ व्हेंटिलेटर उपलब्ध होतील, असे सांगितले. कोरोनाची भीती महत्त्वाचा विषय आहे. भीती दूर करण्याची गरज आहे. पुण्यात अनेकांना कोरोना झाला, त्यातून ते बरेही झाले. अनेकांना तर कोरोना होऊनही त्याची कल्पना नसल्याने ते बरेही झाले. प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच नाशिकचा मृत्युदर सर्वांत कमी आहे. आर्थर रोड कारागृहात दीपक पांडे यांनी कोरोनाविषयी भीती घालविण्याचे चांगले काम केले. शंभर टक्के रुग्ण बरे करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविला. त्याच पद्धतीने पोलिस कोविड सेंटरमध्ये प्रयत्न होतील, असा विश्‍वास व्यक्त केला. तत्पूर्वी पांडे यांनी रुग्णालयाची माहिती देताना कोरोनाशी लढताना पोलिसांना कोरोनाचा सामना करावा लागला. लढाईत कायम रस्त्यावर सर्वांच्या पुढे असणाऱ्या पोलिसांसाठी स्वतंत्र रुग्णालयामुळे सोय होणार आहे. येथे उपचारासोबत योगा, प्राणायाम व नैसर्गिक उपचार केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच पोलिस कुटुंबीयांना रुग्णांना भेटता येईल. शनिवारी (ता. १९) पोलिसांच्या कुटुंबांना रुग्णालय पाहण्याची सोय केल्याचे श्री. पांडे यांनी सांगितले. या वेळी श्री. गमे, श्री. मांढरे यांचीही भाषणे झाली.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

 संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients need to be reassured that the corona can be cured nashik marathi news