आजपासून पीसीएम ग्रुपची सीईटी; २० ऑक्‍टोबरपर्यंत परीक्षा होणार

अरुण मलाणी
Monday, 12 October 2020

२० ऑक्‍टोबरपर्यंत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. ऑनलाइन पद्धतीने संगणकावरून विद्यार्थ्यांना वस्‍तुनिष्ठ स्‍वरूपाचे प्रश्‍न सीईटी परीक्षेत विचारले जाणार आहेत. सध्याच्‍या कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर विशेष काळजी घेतली जात आहे. 

नाशिक : एमएचटी-सीईटी परीक्षेच्‍या दुसऱ्या टप्प्यात भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपची सीईटी सोमवार (ता. १२)पासून राज्‍यभरात होणार आहे. अभियांत्रिकी शाखेला या ग्रुपवरील कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. २० ऑक्‍टोबरपर्यंत ही परीक्षा होणार असून, राज्‍यभरातून पीसीएम ग्रुपची परीक्षा देण्यासाठी एक लाख ५२ हजार ४३० विद्यार्थी प्रविष्ट आहेत.

२० पर्यंत विविध सत्रांमध्ये परीक्षा

पहिल्‍या टप्प्‍यात १ ते ९ ऑक्‍टोबरदरम्‍यान भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) या ग्रुपची परीक्षा झाली. या परीक्षेसाठी राज्‍यातून एक लाख ९३ हजार ९९ विद्यार्थी प्रविष्ठ होते. तर पीसीबी आणि पीसीएम अशा दोन्‍ही ग्रुपसाठी ९० हजार १२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. दुसऱ्या टप्प्‍यातील पीसीएम या ग्रुपच्‍या परीक्षेला सुरवात होत असून, २० ऑक्‍टोबरपर्यंत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. ऑनलाइन पद्धतीने संगणकावरून विद्यार्थ्यांना वस्‍तुनिष्ठ स्‍वरूपाचे प्रश्‍न सीईटी परीक्षेत विचारले जाणार आहेत. सध्याच्‍या कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर विशेष काळजी घेतली जात आहे. 

एक लाख ५२ हजार ४३० विद्यार्थी प्रविष्ट

विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना मास्‍क बंधनकारक असून, सोबत सॅनिटायझरची बाटली ठेवण्यासही परवानगी आहे. दोन दिवसांपूर्वी पीसीएम ग्रुपच्‍या सीईटीसाठीचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासोबतच ओळखपत्रही सोबत बाळगायचे आहे. पीसीएम ग्रुपसाठी राज्‍यभरातून एक लाख ५२ हजार ४३० विद्यार्थी प्रविष्ट असून, सीईटीच्‍या निकालाच्‍या आधारे अभियांत्रिकीच्‍या कॅप राउंडची प्रक्रिया राबविली जाईल. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

जिल्ह्यातील स्‍थिती अशी
 
पीसीएम ग्रुपसाठी प्रविष्ट विद्यार्थी----- सहा हजार ८२२ 
पीसीबी ग्रुपसाठी प्रविष्ट विद्यार्थी------सात हजार ९७२ 
पीसीबी व पीसीएम ग्रुपसाठी विद्यार्थी---सात हजार ८१३  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCM Groups CET from today nashik marathi news