पिंपळगावकरांचा मास्क स्थिरावला हनुवटीवर! कारवाईत सातत्य नसल्याने नागरिकही बिनधास्त

दीपक अहिरे
Friday, 27 November 2020

सहा महिन्यांत ग्रामपंचायतीला अवघ्या तीनशे नागरिकांवर विनामास्कची कारवाई करता आली. त्यांच्याकडून केवळ ६० हजार रुपये दंड वसूल झाला आहे.

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : देशभरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असताना पिंपळगावकर मात्र निर्धास्त आहेत. ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनानेही मास्कसंदर्भातील कारवाई १०० टक्के थांबविली आहे. त्यामुळे मास्क न घालता शहरात फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मास्क असेल, तरी तो हनुवटीवर लावला जात असल्याने कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे. 

रोज हजारो नागगरिक दाखल

टोमॅटोचा हंगाम सुरू असल्याने परप्रांतीय व्यापारी, कामगार यांच्या निवासासह व्यापारी पेठ असल्याने रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येथे स्थिरावले आहेत. त्यातच रोज जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या हजारात आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

कारवाईत सातत्य राहिले नाही

सहा महिन्यांत ग्रामपंचायतीला अवघ्या तीनशे नागरिकांवर विनामास्कची कारवाई करता आली. त्यांच्याकडून केवळ ६० हजार रुपये दंड वसूल झाला आहे. आता तर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याची चर्चा करताना गावात मास्क वापरण्याचे प्रमाणही कमालीचे घटले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट सर्वांवर घोंगावत असताना नागरिक व प्रशासन फारसे गंभीर नाही. कोरोना तसेच मास्कसंदर्भात आरोग्य व शासकीय विभागात सूचना देऊन थकले आहे. मास्कची सक्ती झाल्यानंतर प्रारंभी पोलिसांकडून कारवाईला सुरवात झाली. पिंपळगाव ग्रामपंचायतीने त्याबाबत कारवाईचा बडगा उगरला. पण या कारवाईत सातत्य राहिले नाही. संसर्ग वाढल्यानंतर शासनाने वाॅर्डनिहाय कृतिदल स्थान करण्याचा आदेश बजावला. ती स्थापन झाली; पण नावापुरतीच. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई सुरू केली होती. पण दंड देण्यावरून वादाचे प्रसंग उद्भवत होते. आता आरोग्यधिकाऱ्यांशी चर्चा करून मोहीम पुन्हा सुरू केली जाईल. 
-एल. जे. जंगम (ग्रामविकास अधिकारी, पिंपळगाव बसवंत) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People in Pimpalgaon do not take care to prevent corona Nashik marathi news