प्रतिबंधित क्षेत्रातील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा टक्का घसरला; ३० टक्क्यांपेक्षा दर घसरल्यास कारवाई 

विक्रांत मते
Wednesday, 21 October 2020

कोरोना संसर्ग वाढल्यानंतर वैद्यकीय विभागाने मोठ्या प्रमाणात तपासणी मोहिम हाती घेतली. महापालिकेच्या वतीने एक लाख ॲण्टीजेन टेस्ट खरेदी करण्यात आल्या होत्या.

नाशिक : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने घरोघरी सर्वेक्षण करताना एखादा रुग्ण बाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जाते परंतू गेल्या काही महिन्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत घसरल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त करताना त्यापेक्षा खाली कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची टक्केवारी घसरल्यास कारवाईचा ईशारा दिला आहे. 

कोरोना संसर्ग वाढल्यानंतर वैद्यकीय विभागाने मोठ्या प्रमाणात तपासणी मोहिम हाती घेतली. महापालिकेच्या वतीने एक लाख ॲण्टीजेन टेस्ट खरेदी करण्यात आल्या होत्या. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. त्यात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या ३५ लोकांची तपासणी केली जात होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरु असलेल्या या प्रयत्नांना यश मिळाले होते. राज्यात सर्वाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये नाशिक आघाडीवर होते. परंतू गेल्या काही दिवसात ट्रेसिंग मध्ये कमालीची घट झाली असून ३५ टक्क्यांवरून ३०.२६ टक्क्यांवर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण घसरल्याने चिंता व्यक्त केली असून तीस टक्क्यांच्या खाली हे प्रमाण जावू नये अशा स्पष्ट सुचना आयुक्त कैलास जाधव यांनी वैद्यकीय विभागाला दिल्या. 

थर्मामीटर, ऑक्सिमीटर तपासणी बंधनकारक 

राज्य शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी हि मोहिम महापालिकेच्या वतीने राबविली जात आहे. महापालिकेच्या शिक्षकांच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या या मोहिमेत घरोघरी फक्त आकडेवारी संकलित करताना आजारांची माहिती घेतली जात आहे. परंतू गंभीर आजारांची माहिती संकलित करताना कोरोना बाधित शोधणे देखील महत्वाचे असल्याने सर्वेक्षण करताना आता कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीची थर्मामीटर व ऑक्सिमीटर तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तपासणी करतानाचे फोटो वैद्यकीय अधिकायांना पाठवून खरोखर काम होत आहे कि नाही याची खातरजमा करण्याच्या सुचना आयुक्त जाधव यांनी केल्या. महापालिकेचे शहरात चार कोव्हीड सेंटर आहे त्यातील मेरी व समाजकल्याण केंद्रे विद्यार्थ्यांशी निगडीत असल्याने शासनाने दिवाळी नंतर शाळा, महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतल्यास दोन्ही सेंटर बंद करावे लागणार असल्याने त्यादृष्टीने नियोजनाच्या सुचना देण्यात आल्या. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

दंडात्मक कारवाई असमाधानकारक 

गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात नाशिक देशात अकरावे तर राज्यात दुसया क्रमांकावर आले होते. कोरोनाशी दोन हात करताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छ भारत अभियानात पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासंदर्भात आयुक्त जाधव यांनी आढावा घेतला असता सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, शौचास बसणे, अस्वच्छता, उघड्यावर कचरा टाकणे आदींसाठी दंडात्मक कारवाई असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्याने दंडात्मक कारवाईसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याच्या सुचना दिल्या. कचरा उचलण्यासाठी ऑन कॉल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: percentage of contact tracing in the restricted area dropped nashik marathi news