धक्‍कादायक! जिल्हा परिषदेत दिव्यांग तक्रारदारास मारहाण; झटापटीमुळे एकच गोंधळ  

अरुण मलाणी
Thursday, 8 October 2020

ग्रामपंचायतीबाबत सुरू असलेल्‍या वादाच्‍या पार्श्वभूमीवर जिल्‍हा परिषदेत बुधवारी दिव्‍यांग तक्रारदाराला दोन व्‍यक्‍तींनी मारहाण केल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे. काय घडले नेमके?

नाशिक: ग्रामपंचायतीबाबत सुरू असलेल्‍या वादाच्‍या पार्श्वभूमीवर जिल्‍हा परिषदेत बुधवारी दिव्‍यांग तक्रारदाराला दोन व्‍यक्‍तींनी मारहाण केल्‍याची धक्‍कादायक घटना घडली आहे. 

जिल्हा परिषदेत दिव्यांग तक्रारदारास मारहाण 

टोकडे (ता. मालेगाव) ग्रामपंचायतीने कामात भ्रष्टाचार केला असल्‍याची तक्रार विठोबा द्यानद्यान यांनी जिल्‍हा परिषदेकडे दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत चौकशी समिती नेमून, या प्रकरणात जबाबदारी निश्‍चितीसाठी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्‍या उपस्‍थितीत बुधवारी दुपारी तीनला सुनावणी होणार होती. या सुनावणीसाठी सरपंच सुपडाबाई पंडित निमडे यांच्या वतीने अ‍ॅड. सचिन वाघ, ग्रामपंचायतीचे रोजगारसेवक हरेसिंग धाडिवाल, नामदेव शेजवळ, शांताराम लाठर जिल्‍हा परिषदेत उपस्‍थित झाले. सुनावणीच्‍या काही मिनिटांआधीच तक्रारदार देखील जिल्‍हा परिषदेत पोचले. त्यांना बघताच दोघांनी तक्रारदाराच्‍या शर्टची कॉलर धरत मारहाण करण्यास सुरवात केली.

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

पोलिस दाखल होताच मारेकऱ्यांचा पळ

या दोघांना तक्रारदाराने पकडत संबंधित व्‍यक्‍ती ॲट्रॉसिटी प्रकरणातील फरारी आरोपी असल्‍याचे सांगत दोघांना सीईओंच्‍या दालनात ओढले. या झटापटीमुळे एकच गोंधळ उडाल्‍याने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड दालनाबाहेर येत परिस्‍थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्‍न केला. परंतु दोघांकडून जबर मारहाण सुरूच राहिल्‍याने पोलिसांना बोलविण्यात आले. कार्यालयाच्‍या आवारात पोलिस दाखल होताच मारेकऱ्यांनी पळ काढला. या घटनेसंदर्भात भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: physically challenged complainant beaten in Zilla Parishad nashik marathi news