पंधरा दिवसांत जिल्हा क्रीडासंकुलाचा आराखडा तयार करा - छगन भुजबळ

विनोद बेदरकर
Wednesday, 11 November 2020

क्रीडांगण, कॅफेटेरिया, प्रशासकीय इमारत, खेळाडूंच्या मूलभूत गरजा असलेल्या या बहुउद्देशीय जिल्हा क्रीडासंकुलाचे बांधकाम करताना सध्या उपलब्ध निधीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.  

नाशिक : आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव पोचविणाऱ्या खेळाडूंचे अनुभव आणि भावी खेळाडूंच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा क्रीडासंकुलाची उभारणी करण्यात यावी, तसेच पंधरा दिवसांत क्रीडासंकुलाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा क्रीडासंकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 

पंधरा दिवसांत आराखडा 

भुजबळ म्हणाले, की शासनाच्या क्रीडा धोरणानुसार नाशिक जिल्ह्याच्या क्रीडासंकुलासाठी जिल्हा परिषदेकडून करार पद्धतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वसमावेशक असा क्रीडासंकुलाचा नवीन आराखडा पंधरा दिवसांत तयार करण्याचे निर्देशही पालकमंत्री भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दिले. क्रीडासंकुलात विविध खेळांच्या अनुषंगाने खेळाडूंना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रेक्षकांसाठी सुविधांयुक्त अशा प्रेक्षक गॅलरीची क्षमता वाढविण्यावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. क्रीडांगण, कॅफेटेरिया, प्रशासकीय इमारत, खेळाडूंच्या मूलभूत गरजा असलेल्या या बहुउद्देशीय जिल्हा क्रीडासंकुलाचे बांधकाम करताना सध्या उपलब्ध निधीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.  

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एन. राजभोज, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: plan district sports complex will be prepared in fortnight nashik marathi news