परिसरात दहशत माजविणाऱ्या चार संशयितांची धिंड; पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत

राजेंद्र बच्छाव
Thursday, 8 October 2020

दहशत माजविणाऱ्या व विविध गुन्ह्यांत इंदिरानगर पोलिसांनी अटक केलेल्या चार संशयितांची गुरुवारी (ता. ८) परिसरात बेड्या घालून धिंड काढली. 

नाशिक/इंदिरानगर : दहशत माजविणाऱ्या व विविध गुन्ह्यांत इंदिरानगर पोलिसांनी अटक केलेल्या चार संशयितांची गुरुवारी (ता. ८) परिसरात बेड्या घालून धिंड काढली. 

वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी सांगितले की, नीलेश इंगळे ऊर्फ सोनू महाजन (रा. म्हाडा कॉलनी, समर्थनगर), नीलेश ऊर्फ बंटी भुरे (रा. कैलास रो- हाउस, वासननगर) रवींद्र भवर आणि गणेश लिपने (रा. आनंदनगर) यांनी पाथर्डी येथील अजय सावंत याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याला जखमी केले. तसेच परिसरात दहशत माजवणे, गुंडगिरी करणे या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली.

हेही वाचा > दिघावकर साहेब लक्ष असू द्या! व्यापाऱ्याकडून धूळगावच्या शेतकऱ्यांची फसवणूक 

नागरिकांच्या मनात या चौघांची प्रचंड दहशत होती. ती कमी व्हावी, या उद्देशाने ते राहात असलेल्या उपरोक्त परिसरासह पाथर्डी फाटा, प्रशांतनगर आदी भागांतून त्यांची धिंड काढण्यात आली. नागरिकांच्या त्यांच्याविषयी अजून तक्रारी असतील, तर पोलिस ठाण्यात न घाबरता तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश भामरे, निखिल बोंडे, उपनिरीक्षक प्रवीण बाकले यांच्यासह पटेल, सावंत, वसावे, परदेशी आदींनी ही कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनीही स्वागत केले असून, यामुळे कमी वयात गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या युवकांवर जरब बसेल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  
 

हेही वाचा > धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी मुक्तिभूमी राहणार सुनीसुनी! केवळ शासकीय पदाधिकारीच राहणार उपस्थित

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested four criminals nashik marathi news