महाविकास आघाडीचे पडसाद : ग्रामीणप्रमाणे शहरात मुसंडीसाठी शिवसेनेला मिळणार बळ...भुजबळांची भूमिका ठरणार निर्णायक

विक्रांत मते
Monday, 27 July 2020

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आग्रहामुळे काँग्रेसची शकले झाली असली, तरीही जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेशी मोट बांधलेली असताना काँग्रेसला सामावून घेतले. मात्र नाशिक महापालिकेच्या राजकारणात भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे विरोधकांची डाळ शिजेना अशी झालीय.

नाशिक : आगामी दीड वर्षात महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरवात होईल. पण महाविकास आघाडीच्या दृष्टीने शहराच्या राजकारणात यंत्रणा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत नाही.

छगन भुजबळांची भूमिका ठरणार निर्णायक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आग्रहामुळे काँग्रेसची शकले झाली असली, तरीही जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेशी मोट बांधलेली असताना काँग्रेसला सामावून घेतले. मात्र नाशिक महापालिकेच्या राजकारणात भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे विरोधकांची डाळ शिजेना अशी झालीय. राज्यातील महाविकास आघाडीची समीकरणे थेट निवडणुकीत कायम राहिल्यास ग्रामीणमध्ये नंबर वन असलेल्या शिवसेनेला शहरात मुसंडी मारण्यासाठी बळ मिळणार आहे. राष्ट्रवादीची मदार भुजबळ यांच्यावर असल्याने आगामी राजकारणात त्यांची भूमिका निर्णायक ठरेल. त्याच वेळी शहरी-ग्रामीण अशा दोन्ही भागांत काँग्रेसला मरगळ झटकण्याची संधी मिळेल. 

ग्रामीणप्रमाणे शहरात मुसंडीसाठी शिवसेनेला मिळणार बळ 

नाशिक शहराच्या राजकारणात शिवसेना हुकमी एक्का असताना अंतर्गत कलहाने सत्तेचे शीड कोलमडून पडले. सद्यःस्थितीत महापालिकेत शिवसेनेचे ६६ आणि शिवसेनेचे ३६ नगरसेवक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे सिंगल डिजिटमध्ये आहे. आगामी दीड वर्षात महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरवात होईल. पण महाविकास आघाडीच्या दृष्टीने शहराच्या राजकारणात यंत्रणा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत नाही. मागील महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या ३८ उमेदवारांना पाचशेच्या आत मतांनी पराभव झाला आहे. त्याचप्रमाणे राज्य आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्याने फाटाफुटीच्या राजकारणात भाजपकडून बाजी मारलेल्या नगरसेवकांना राज्यातील महाविकास आघाडीच्या राजकारणात गळाला लावण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेची २५ जागांवर नजर आहे. महाविकास आघाडीच्या राजकारणात अर्थात, शिवसेनेचा आग्रह अधिक जागांसाठी राहणार आहे. अशा वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कितपत सकारात्मक प्रतिसाद मिळतो, यावर भविष्याच्या राजकारणाची स्थिती अवलंबून असेल. जुने नाशिक, सिडको, सातपूर, प्रसाद सर्कलच्या पुढे गंगापूर रोड अशा शहराच्या विविध भागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मानणारे मतदार असल्याने शिवसेना महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी आग्रही राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच वेळी विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्थानिक नेतृत्व दीड वर्षामध्ये उभे करावे लागेल. 

हेही वाचा > पुतणीला सतत टोमणे मारणे भोवले काकाला... केले  आत्महत्येस प्रवृत्त

पक्षीय सीमारेषा झाल्या धूसर 
जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र असले, तरीही पक्षीय सीमारेषा धूसर झाल्या आहेत. ही बाब विशेषतः सत्ताधाऱ्यांसाठी आगामी काळात डोकेदुखीची ठरणार आहे. पालकमंत्र्यांवरील भार वाढीस लागेल. जिल्हा परिषदेच्या राजकारणात जिल्हावासीयांनी यापूर्वी काय पाहिले आहे. काँग्रेसचे आठ सदस्य असताना तीन गट झाले. राष्ट्रवादीच्या गोटातून स्वतंत्र उमेदवारी दाखल केली गेली. राष्ट्रवादीचे गटनेते इगतपुरीचे, उपाध्यक्ष चांदवडचे आणि सभापती येवल्याचे ही स्थिती पाहता, येत्या दीड वर्षामध्ये जिल्ह्यात सर्वदूर काम उभे करण्याची संधी राष्ट्रवादीला आहे. पण त्यादृष्टीने काम उभे राहताना दिसत नाही. 

हेही वाचा >  संतापजनक! मुलाला भेटायला गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून बेदम मारहाण 

महाविकास आघाडीसंबंधी संभाव्य राजकीय शक्यता 
० मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय करून सत्तेसाठी एकीकरण 
० ज्याच्या त्याला जागांचे वाटप करून एकोप्याने लढाई 
० ग्रामीणमध्ये फुटीतून भाजपच्या गळाला उमेदवार लागू शकतील 

रिपोर्टर - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political analytics on nashik politics marathi news