डांबराऐवजी टाकलेला मुरूम दुसऱ्याच दिवशी खड्ड्यांबाहेर?...कुठे ते वाचा

antapura road.jpg
antapura road.jpg

नाशिक/अंतापूर : कातरवेल ते सटाणा (ता. बागलाण) या रस्त्याची पावसामुळे प्रचंड दुरवस्था झाली असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने सदर रस्त्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास होणाऱ्या अपघातास व वाहनांचे नुकसानभरपाईस संबंधित विभाग जबाबदार असेल, असा इशारा नाशिक जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष व नामपूर बाजार समितीची ज्येष्ठ संचालक कृष्णा भामरे, महाराष्ट्र राज्य कृषिभूषण खंडेराव शेवाळे यांनी दिला आहे. 

संथ गतीने काम सुरू असल्याचा आरोप

विंचूर-प्रकाशा मार्ग अंतर्गत पिंपळनेर ते सटाणा या ४५ किलोमीटर रस्ता रुंदीकरण- काँक्रिटीकरणाचे काम मागील वर्षापासून महाराष्ट्र विकास महामंडळ विभागाने अहमदाबाद येथील आशिष इंफ्रॉकॉन या कंपनीस सुमारे १९० कोटी रुपयांची निविदा काढून दिले आहे. संबंधित कंपनीने आतापर्यंत दुतर्फा शेकडो वर्षांपूर्वीच्या लहान-मोठ्या झाडांची कत्तल करून अत्यंत किरकोळ कामाला सुरवात केली आहे. ते कामही अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. सध्या पावसाळा असल्याने संबंधित रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. याकडे कंपनीने दुर्लक्ष करत संथ गतीने काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

खड्डे 'जैसे थे

पंधरा दिवसांपूर्वी कंपनीला डांबर मिळाले नसल्याने खड्ड्यांमध्ये मुरूम टाकला; मात्र मुरूम लगेच निघाल्याने खड्डे 'जैसे थे' झाले आहेत. रस्त्याबरोबर मोसम नदीवरील कमकुवत पुलावरही खड्डे पडल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील हा महत्त्वपूर्ण गंभीर प्रश्न सोडवावा, अशी मागणी श्री. भामरे, श्री. शेवाळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी, ताहाराबाद सोसायटी सभापती के. पी. जाधव, पिंपळकोठे सोसायटीचे सभापती पंकज भामरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

३० जुलैला ताहाराबाद-अंतापूर रस्त्यावरील खड्डे चुकवताना दोन वाहनांचा अपघात होऊन पिता-पुत्री जागीच मृत झाले होते. संबंधित लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन तालुक्यातील सर्व रस्त्यांची कामे आदर्शवत करून मार्गी लावावेत. - रोहिदास जाधव, प्रगतिशील शेतकरी, अंतापूर 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com