"पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 16 June 2020

"मी गेले चार दिवस खूप मानसिक तणावातून जात आहे. माझी पत्नी पूजा शनिवारी घरातून निघून गेली. मुंगसे येथील कल्पेश सूर्यवंशी हा आमिष दाखवून तिला घेऊन गेला आहे. त्यामुळे मी एवढे दिवस कमावलेली इज्जत पत्नी मातीत मिळवून निघून गेली आहे." 

नाशिक : पत्नी चार वर्षांच्या मुलाला सोडून मित्राबरोबर घर सोडून निघून गेली. त्यामुळे पती एवढा निराश झाला, की त्याने फेसबुकवर चिठ्ठी पोस्ट करीत आत्महत्या केली. पोलिसांनी त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करीत त्याने केलेली आत्महत्या अनेकांना चुटपुट लावून गेली. आता पोलिस त्याच्या आत्महत्येबाबत गुन्हा दाखल करण्यात व्यस्त आहेत. 

पत्नी पळाली चार वर्षांच्या मुलाला सोडून...​

उमराणे (ता. देवळा) येथील राहुल चव्हाण (पाटील) हा पदवीधर युवक ऍपे ही मालवाहू रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या घरी आई, पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. तो सोशल मीडियावरदेखील चांगलाच सक्रिय होता. त्याची पत्नी पूजा काही दिवसांपूर्वी परिचित युवकाने फूस लावल्याने घर सोडून निघून गेली. त्यामुळे गेले चार दिवस हा युवक अत्यंत खचला होता. या घटनेमुळे समाजात काय चर्चा होईल? लोक काय म्हणतील, या विचाराने तो घराबाहेरदेखील पडला नव्हता. त्याच्या मनातील ही घालमेल कोणालाच कळली नाही. या तणावातच त्याने आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली. ही चिठ्ठी फेसबुकवर टाकली. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा झाली. अनेकांना त्याने खरेच आत्महत्या केली की गंमत केली, याची शंका आली. घरी चौकशी केल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोचल्यावर त्यांनी पुढील तपास सुरू केला. मात्र परिसरात अत्यंत मनमिळाऊ व सगळ्यांशी हास्यविनोद करणाऱ्या राहुलने आत्महत्या केल्याने सगळ्यांना त्याची चुटपुट लागली. 

 

No photo description available.

 

राहुलने चिठ्ठीत लिहिलेला मजकूर असा -

 मी गेले चार दिवस खूप मानसिक तणावातून जात आहे. माझी पत्नी पूजा शनिवारी घरातून निघून गेली. मुंगसे येथील कल्पेश सूर्यवंशी हा आमिष दाखवून तिला घेऊन गेला आहे. त्यामुळे मी एवढे दिवस कमावलेली इज्जत पत्नी मातीत मिळवून निघून गेली आहे. तिने जाताना माझ्या चार वर्षांच्या मुलाचादेखील विचार केला नाही. त्यामुळे आता मला समाजात, नातेवाइकांत तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. हा जो काही प्रकार म्हणजे तू आणि तो कल्पेश मुन्ना पूर्वीच घरात सापडले होते. त्यातले मला काहीही माहीत नव्हते. हे जर मला माहीत असते, तर मी हे प्रेम कधीच होऊ दिले नसते. आता मी आत्महत्या करतो आहे. त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त पूजा आणि कल्पेश आहे. मला तिची गरज नाही, पण मला माझ्या इज्जतीची गरज आहे. पोलिस प्रशासनाला मला एवढेच सांगणे आहे, की त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Posting on Facebook before he committed suicide nashik marathi news