मस्तच! कुठलाही साचा न वापरता 'त्यांनी' बनवली मनमोहक भांडी अन् वस्तू; कारागिराचे तालुकाभर कौतुक

संतोष विंचू
Wednesday, 16 September 2020

शिरसाठ यांनी बनविलेल्या वस्तू सोशल मीडियातून फिरल्यावर अनेकांनी त्याचे कौतुक करत ऑनलाइन ऑर्डरही दिल्या असून, या वस्तू पाहण्यासाठी गर्दीही होऊ लागली आहे. नवरात्र व दिवाळी सणासाठी घटी, पणत्या बनविले असून, पाच रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत किमतीला विकली जाते आहे.

नाशिक : (येवला)चाकावर मातीच्या वस्तू बनविल्या जातात पण कुठलाही साचा न वापरता देखणी भांडी अन् मनमोहन शोभेच्या वस्तू ममदापूर येथील वाल्मीक शिरसाठ या कारागिराने तयार केल्या आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आत्मसात केलेले कौशल्य आणि त्यातून साकारलेल्या मातीच्या शोभेच्या वस्तू तालुकाभर कौतुकाचा विषय ठरत आहे. 

मातीपासून बनविलेल्या कलाकुसरीला पसंती 

दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या ममदापूर येथील या होतकरू युवकाने आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून प्रक्रिया केलेल्या मातीच्या सहाय्याने डोळ्यांचे पारणे फिटेल, अशा मातीच्या भांडे व शोभेच्या वस्तू बनविल्या आहेत. विविध सणांसह घरांच्या सजावटीसाठी शोभून दिसतील अशा अनेक वस्तू हातांनी आकार देऊन मूर्त रूप दिले आहे. बंगल्यासाठी झुंबर, घरात वापरण्यासाठी ग्लास, वाटी, तांब्या, फुलपात्र, कुक्कर, चमचा, दही व ताक यासाठी भांडी एक लिटरचे माप, भाजीसाठी पातेले, दिवाळी सणासाठी व नवरात्रीसाठी देवीचे घट अशा अनेक माती व प्रक्रिया करून तयार केलेल्या विशिष्ट भांड्यांचा आकार लक्ष वेधून घेत आहे. नवरात्र व दिवाळी सणाला वापरासाठी लागणाऱ्या वस्तू सध्या ते बनवत आहेत. कोरोनाचा फटका बसला तरी या भांड्यांना येवला, कोपरगाव, शिर्डी, नाशिक, वैजापूर अशा ठिकाणी मागणी आहे. 

अशी आत्मसात केली कला 

शिरसाठ यांनी नाशिक येथे खादी ग्रामोद्योग संस्थेत दहा दिवसांचे प्रशिक्षण घेत ही कला आत्मसात केली आहे. याच वेळी त्यांना माती मळणीयंत्र शंभर टक्के अनुदानावर मिळाले असून, वस्तू बनविण्यासाठी आवड निर्माण झाली. या वस्तूंतून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर व आपल्या हातांनी चिखलाला योग्य असा आकार देऊन शिरसाठ यांनी बनविलेल्या वस्तू सोशल मीडियातून फिरल्यावर अनेकांनी त्याचे कौतुक करत ऑनलाइन ऑर्डरही दिल्या असून, या वस्तू पाहण्यासाठी गर्दीही होऊ लागली आहे. नवरात्र व दिवाळी सणासाठी घटी, पणत्या बनविले असून, पाच रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत किमतीला विकली जाते आहे.

हेही वाचा > "आई गं..तुझी आठवण येतेय.."भेदरलेल्या अवस्थेत चिमुरडा एकटाच रस्त्यावर; सोशल मिडियामुळे झाला चमत्कार

खादी ग्रामोद्योग संस्थेने विविध वस्तू बनविण्यासाठी दिलेल्या प्रशिक्षणातून या कलेला प्रेरणा मिळाली. शिवाय १०० टक्के अनुदानावर चाक व माती मळणी यंत्र दिल्याने या वस्तू बनविण्यासाठी उभारी मिळाली. हस्तकलेच्या माध्यमातून या वस्तू बनवत असल्याने चांगली पसंती मिळत आहे. अजूनही नावीन्यपूर्ण शोभेच्या वस्तू बनविण्याचा प्रयत्न आहे. - वाल्मीक शिरसाठ, कारागीर 

हेही वाचा > सहनशक्तीचा बांध तुटला! विवाहितेने विहिरीत उडी घेत संपविली जीवनयात्रा; काय घडले?

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preference is given to pottery made by potters from Mamdapur nashik marathi news