प्रायोगिक रंगभूमीला डिजिटल उभारी; १८ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नाट्यमहोत्सव

preparations for the online drama festival nashik marathi news
preparations for the online drama festival nashik marathi news

नाशिक : कोरोना संकटामुळे राज्यातील रंगभूमी चळवळ सात महिन्यांपासून थंडावली आहे. पुणे, मुंबई, नाशिकमधील रंगकर्मींनी त्यावर मात करत ऑनलाइन माध्यमातून डिजिटल प्रायोगिक धडपड सुरू केली. कल्याण येथील अभिजित झुंजारराव यांच्या अभिनय, कल्याण संस्थेतर्फे ऑनलाइन थिएटर प्रिमिअर लीग सुरू करण्यात येऊन निवडक गाजलेल्या नाटकांचा महोत्सव १८ ऑक्टोबरपासून तीन दिवस रोज रात्री आठला चालेल. 

नाटके ऑनलाइन पाहण्याची संधी

महोत्सवात १८ ऑक्टोबरला पुण्याचे नाटकघरनिर्मित, रामू रामनाथनलिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘शब्दांची रोजनिशी’, १९ ऑक्टोबरला डॉ. आशुतोष दिवाणलिखित व अभिजित झुंजारराव दिग्दर्शित ‘घटोत्कच’ आणि २० ऑक्टोबरला नाशिकचे प्रमोद गायकवाडनिर्मित, दत्ता पाटीललिखित व सचिन शिंदेदिग्दर्शित ‘हंडाभर चांदण्या’ ही नाटके ऑनलाइन पाहण्याची संधी जगभरातील रसिकांना उपलब्ध होईल. ‘शब्दांची रोजनिशी’ या नाटकात दोन कथा आहेत. जगातील कुठल्याही भाषेत असतात तशा त्या सुरस आणि चमत्कारिक आहेत. अशा कथा मनोरंजन करतात आणि क्लेशही देतात. त्या अनाकलनीय, अतर्क्य, अघटित असतात. त्या खऱ्या अथवा कल्पित असतात. अशा कहाण्यांची ही अनोखी गोष्ट आहे. एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगता येईल, की शब्दांची रोजनिशी, हा अस्सल नाट्यानुभव आहे. अमर देवगावकर यांनी अनुवादित केले आहे. केतकी थत्ते आणि स्वत: अतुल पेठे यात भूमिका करत आहेत. 

घटोत्कच ​

‘घटोत्कच’ या नाटकात महाभारतातील घटोत्कच या व्यक्तिरेखेला समकालीन वास्तवाची अदृश्य किनार देत राजकीय पक्षांच्या कार्यात जीव तोडून काम करणाऱ्या आणि शेवटी डावलल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यात एक घटोत्कच असतोच, हे अधोरेखित केले आहे. भीम आणि हिडिंबा यांचा पुत्र असलेला घटोत्कच महाभारतातील युद्धात ओढला जातो आणि लढतानाही हिंसा, राजकारण, आपल्याच वाटणाऱ्या माणसांची अनाकलनीय वागणूक पाहतो. युद्धज्वरात सज्जन वाटणारे राज्यकर्तेही किती निष्ठुर होतात किंबहुना त्यांना व्हावेच लागते, याचे या नाटकात दर्शन होते. राहुल शिरसाठ, हरीश भिसे, अभिनय तालखेडकर, राजन पंधे, ऋचिका खैरनार, श्रेयसी वैद्य यांच्या भूमिका आहेत. 

हंडाभर चांदण्या 

महोत्सवात सादर होणारे शेवटचे नाटक म्हणजे ‘हंडाभर चांदण्या.’ या नाटकातून पाण्याचा अत्यंत भीषण प्रश्न वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. पाण्याच्या टँकरची डोळ्यात प्राण आणून वाट पाहण्यासाठी माळावर जमलेल्या छोट्याशा दुष्काळी गावातील विलक्षण गोष्ट यात मांडली आहे. लोकसंगीताच्या प्रभावी माध्यमातून सद्यःस्थितीवर सध्या जगण्यातून उपहासात्मक भाष्य करणारे हे नाटक आहे. प्राजक्त देशमुख, प्रणव पगारे, दीप्ती चंद्रात्रे, गीतांजली घोरपडे, नूपुर सावजी, अरुण इंगळे, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, धनंजय गोसावी यांच्या भूमिका आहेत. महोत्सवासाठी ऑनलाइन तिकिटे https://www.rangabhoomi.com/tpl2 या लिंकवर उपलब्ध आहेत. अथवा ९९६७६९९९५९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com