क्रीडा स्‍पर्धांवर निरीक्षकांची असणार करडी नजर; गैरप्रकार रोखण्यासाठी आयुक्‍तांचा निर्णय

sports.jpg
sports.jpg

नाशिक : एकविध खेळाच्‍या राज्‍य संघटनांमार्फत होणाऱ्या राज्‍य, राष्ट्रीय स्‍पर्धेसाठी क्रीडा विभागाच्या निरीक्षकाची उपस्‍थिती, तसेच नोकरी आरक्षण अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने घेतले आहेत. या निर्णयामुळे गैरप्रकारातून प्रमाणपत्र मिळवत क्रीडा कोट्यातून नोकरी मिळविण्याच्‍या प्रयत्‍नांना आळा बसणार आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी आयुक्‍त बकोरिया यांचा निर्णय 

काही दिवसांपूर्वी अशा स्‍वरूपाचे प्रकरण उघडकीस आल्‍यानंतर क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी या संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक मंगळवारी (ता. २९) जारी केले आहे. या परिपत्रकात विविध सूचना मांडलेल्‍या आहेत. त्‍यानुसार एकविध खेळ संघटनेद्वारे राज्‍यात होणाऱ्या राज्‍य व राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धांसाठी क्रीडा संचालनालयाचा निरीक्षक (स्पोर्ट ऑब्‍झर्व्‍हर) पाठविण्यात येतील. यासाठी संबंधित संघटनेने ज्‍या जिल्ह्यात राज्‍य व राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धा आयोजन होणार आहेत, त्‍या ठिकाणच्‍या जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयास क्रीडा निरीक्षक पाठविण्याबाबत किमान पंधरा दिवस आधी कळविणे बंधनकारक राहील.

अहवाल आठ दिवसांत क्रीडा संचालनालयास सादर

संबंधित क्रीडा निरीक्षकांनी जिल्‍हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत स्‍पर्धाविषयक अहवाल आठ दिवसांत क्रीडा संचालनालयास सादर करायचा आहे. एकविध क्रीडा संघटनेच्‍या राज्‍यस्‍तरीय क्रीडा स्‍पर्धेसाठी जिल्‍हा क्रीडा अधिकारी तसेच राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धेसाठी संबंधित विभागीय उपसंचालकांना आंतरराष्ट्रीय क्रीडा संचालनालयाचा निरीक्षक पाठविण्याचे अधिकार राहतील. स्‍पर्धेसाठी उपस्‍थित निरीक्षकांनी राज्‍य व राष्ट्रीय स्‍पर्धेचे संपूर्ण रेकॉर्ड हे स्‍पर्धा संपल्‍यानंतर त्‍याच दिवशी संघटनेचे अध्यक्ष, सचिवांच्‍या स्‍वाक्षरीसह संकलित करणे आवश्‍यक राहील. 

अंमलबजावणी करणे आवश्‍यक 

राज्‍याबाहेर होणाऱ्या स्‍पर्धांनंतर स्‍पर्धेत सहभागी खेळाडूंची यादी, स्‍पर्धेचे निकालपत्रक तसेच स्‍पर्धेतील प्रावीण्यधारक खेळाडूंना प्राप्त प्रमाणपत्रांच्या तपशिलाबाबत माहिती राज्‍य संघटनेने विद्यमान अध्यक्ष, सचिवांनी प्रमाणित करून आठ दिवसांत क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालकांकडे पाठवायची आहे. राज्‍यात कार्यरत अधिकृत एकविध खेळ संघटनांनी त्‍यांच्या अधिकृत संकेतस्‍थळावर क्रीडा स्‍पर्धांचे निकालपत्र, प्रमाणपत्र वितरणाबाबत माहिती प्रसिद्ध करायची आहे. दरम्‍यान, यापूर्वी जारी केलेल्‍या शासन निर्णयात स्‍पर्धा आयोजनासंदर्भात दिलेल्‍या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्‍यक राहणार असल्‍याचेही परिपत्रकात नमूद केले आहे. 

संंपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com