पेरू, मोसंबीच्या गर्दीतही डाळिंब खातोय भाव; किरकोळ बाजारात गाठली शंभरी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

या भागातील डाळिंबाची लाली दिल्ली, मुंबई, कोलकता, बनारस, जयपूर, अहमदाबाद, सुरत, इंदोर, लखनौ आदी मोठ्या शहरांमध्ये झळाळी घेत आहे. नैसर्गिक आपत्ती न आल्यास डाळिंब बळीराजाला चांगली साथ देईल. सध्या किरकोळ बाजारात डाळिंब १०० ते १२० रुपये किलोने विकले जात आहे.

मालेगाव (नाशिक) : बाजारात पेरू, सफरचंद, मोसंबी, अंजीर, बोरं, चिकू, पपई या फळांची आवक वाढली आहे. या सर्व फळ पिकांच्या गर्दीतही कसमादेसह नाशिक जिल्ह्याचे आवडते पीक डाळिंब भाव खात आहे. आजघडीला डाळिंबाला बांधावर ७० ते ८० रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात डाळिंबाने शंभरी पार केली आहे. डिसेंबरमध्ये दिल्लीसह उत्तर भारतात होणाऱ्या लग्नसोहळ्यांमुळे डाळिंबाचा भाव आणखी वधारण्याची शक्यता आहे.

किरकोळ बाजारात डाळिंब १०० ते १२० रुपये

तेल्या नियंत्रणात आल्याने नाशिक व सोलापूर जिल्हा पुन्हा डाळिंबाचे आगार होऊ पाहत आहे. कसमादेत डाळिंबाने पुन्हा उभारी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत नाशिक जिल्ह्यात दहा हजारांपेक्षा अधिक हेक्टरने क्षेत्र वाढले आहे.जिल्ह्यातील क्षेत्र ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. कोरोनामुळे देशभरातील बाजारपेठांमध्ये शेतमालाचे भाव घसरले. या काळातही डाळिंबाचे भाव ४० ते ५० रुपये किलोपर्यंत टिकून राहिले. जून महिन्यात तर भगवा ६० ते ७० रुपये किलोपर्यंत विकला गेला. या भागातील डाळिंबाची लाली दिल्ली, मुंबई, कोलकता, बनारस, जयपूर, अहमदाबाद, सुरत, इंदोर, लखनौ आदी मोठ्या शहरांमध्ये झळाळी घेत आहे. नैसर्गिक आपत्ती न आल्यास डाळिंब बळीराजाला चांगली साथ देईल. सध्या किरकोळ बाजारात डाळिंब १०० ते १२० रुपये किलोने विकले जात आहे.

पेरू, पपई झाली स्वस्त

घाऊक बाजारात फळ पिकांमध्ये पेरू आणि पपईचे दर अत्यंत कमी आहेत. दोन्ही फळ पिकांची बाजारात मोठी आवक आहे. वीस किलो पेरूचे क्रेट ७० ते २०० रुपयांपर्यंत तर पपईचा दर ५० ते १०० रुपये क्रेट आहे. सफरचंद, अंजीर, बोरं, काकडी, चिकू आदी फळेही बाजारात आली आहेत. दिवाळी फराळामुळे फळांची मागणी काहीशी घटली आहे. डाळिंबाचे भाव टिकून आहेत. या भागात लग्न समारंभांमध्ये फळांची चव चाखली जाते. त्यामुळे डाळिंब तेजीतच राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे. नैसर्गिक संकट न आल्यास भविष्यातही तो कायम राहू शकेल. पेरू, पपई व इतर फळ पिकांना बाजारभाव नसल्याने खर्चही निघत नाही. मर व तेल्या रोगाला अटकाव करण्यात यश आल्याने नाशिक जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र वाढत आहे. या वर्षी पाणी उपलब्ध असल्याने फळ पिकांना मोठा वाव आहे. - अरुण देवरे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: price of pomegranate in the retail market is Rs 100 nashik marathi news