VIDEO : हिंदुत्ववादी संघटनांचा ‘रामायण’वर राडा! दफनभूमीसाठी जागा देण्यावरून वाद 

Pro Hindu organizations went to Mayor Satish Kulkarnis bungalow Nashik Marathi news
Pro Hindu organizations went to Mayor Satish Kulkarnis bungalow Nashik Marathi news

नाशिक : जुने नाशिक भागातील अमरधामच्या बाजूला मुस्लिम समाजाला दफनविधीसाठी जागा देण्याचा ठराव स्थायी समितीने फेटाळून लावल्यानंतरही महापालिकेच्या मिळकत विभागाकडून याबाबत कार्यवाही सुरू झाल्याने या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना ‘रामायण’ या महापौरांच्या बंगल्यावर घेराव घालत जाब विचारला.

महापौर कुलकर्णी यांनी स्थायी समितीने यापूर्वीच ठराव रद्द केला असल्याने कब्रस्तानसाठी जागा दिली जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर वाद निवळला. यादरम्यान जोरदार घोषणाबाजी व वादावादी झाल्याने रामायण बंगल्यावरील वातावरण चिघळल्याचा प्रकार घडला. 

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढत असताना स्मशानभूमीसह कब्रस्तानमध्येही जागा कमी पडत असल्याने नगरसेविका समीना मेमन यांनी मुस्लिम समाजाला दफनविधीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. नाशिक अमरधामच्या वरच्या बाजूला लिंगायत, गवळी, गोसावी, नवनाथ पंथीय, बौद्ध समाजातील मृतांवर अत्यंसस्कारासाठी जागा आहे. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचे काम सुरू असताना याच जागेच्या बाजूला सर्व्हे क्रमांक ३७२, ६३, ६४ व ६५ व ६९ मधील अंशतः काही जागा दफनविधीसाठी देण्याचा ३९० क्रमांकाचा ठराव नोव्हेंबरमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. हिंदू स्मशानभूमीची जागा देण्यास हिंदुत्ववादी संघटना, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने तीव्र विरोध करताना आंदोलनाचा इशारा दिला होता.

यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांच्यासह महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते यांना विरोधाचे निवेदन देण्यात आले होते. या प्रकरणाला धार्मिक रंग चढत असल्याने स्थायी समितीने मंजूर केलेला ठराव रद्द केला. मात्र छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने कब्रस्तानसाठी पुन्हा जागेची मागणी केली. निवेदनानुसार मिळकत विभागाने कार्यवाही सुरू केली असताना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. ३१) महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी धाव घेत जाब विचारला.

अधिकारी व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक

या विषयासंदर्भात महापौर कुलकर्णी अनभिज्ञ असल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना पाचारण केले. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक अंकुश सोनकांबळे व कार्यकारी अभियंता राजू आहेर यांनी कब्रस्तानसाठी जागेची मागणी आल्याने नियमानुसार मिळकत विभागाकडे नस्ती आल्याचे सांगितले. मात्र कार्यवाही झाली नसल्याची माहिती दिल्यानंतर कैलास देशमुख, नंदू कहार, विनोद थोरात, रामसिंग बावरी आदींनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. या वेळी अधिकारी व आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आंदोलनकर्त्यांची महापौर कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी समजूत घालताना कब्रस्तानसाठी जागा देणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. 

जागेवर लागणार फलक 

हिंदुत्ववादी संघटनांनी संबंधित जागेवर हिंदू स्मशानभूमी असा फलक लावण्याचा निर्णय घेतला, तर महापौर कुलकर्णी व स्थायी समिती सभापती गिते यांनी स्थायी समितीने यापूर्वी ठराव रद्द केल्याने नव्याने जागा देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com