'मे. टाटा प्रोजेक्ट' कंपनीला नोव्हेंबरअखेर मुदत; अन्यथा थेट कारवाईच

विक्रांत मते
Friday, 13 November 2020

लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने पुन्हा कामाला विलंब झाला. जूनमध्ये मुदत संपुष्टात आली. जून ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत एलईडी बसविण्याचे नव्याने आदेश देण्यात आले. परंतु अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. 

नाशिक : मे. टाटा प्रोजेक्ट कंपनीला तीनदा मुदतवाढ देऊनही अंतिम मुदत असलेल्या नोव्हेंबरअखेर एलईडी फिटिंग न बसविल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आतापर्यंत ९० हजारांपैकी ७७ हजार ८०५ पथदीपांवर एलईडी फिटिंग बसविली आहे. 

एलईडी न बसविल्यास डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई 

वीजबचतीच्या उद्देशाने शहरातील ९० हजार पथदीपांवर एलईडी फिटिंग बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सात वेळा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर मे. टाटा प्रोजेक्टला काम देण्यात आले. २०१९ मध्ये स्थायी समितीने प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर आचारसंहितेमुळे कार्यारंभ आदेश देण्यास विलंब झाला. निवडणुकीनंतर कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर काम सुरू होणे अपेक्षित होते. ऑगस्ट २०१९ ते जून २०२० हा कालावधी एलईडी फिटिंग बसविण्यासाठी निश्‍चित करण्यात आला. परंतु या कालावधीत अवघ्या ३५ हजार खांबावर फिटिंग बसल्या. लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने पुन्हा कामाला विलंब झाला. जूनमध्ये मुदत संपुष्टात आली. जून ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत एलईडी बसविण्याचे नव्याने आदेश देण्यात आले. परंतु अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. 

 नोव्हेंबरअखेर काम पूर्ण करण्याच्या सूचना

सर्वेक्षणानुसार शहरात ९० हजार पथदीप असून, त्यावर ऑगस्ट २०१९ ते जून २०२० एलईडी दिवे लागणे अपेक्षित होते. सात महिन्यांत जेमतेम ३५ हजारच पथदीप बसवले गेल्याने संबंधित ठेकेदारास कोरोनाच्या नावाखाली नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. नोव्हेंबर संपत असताना एलईडी दिवे बसविण्याचे काम अपूर्ण आहे. त्यावर स्थायी समितीत जोरदार चर्चा होऊन डिसेंबरपासून ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला. सद्यःस्थितीत शहरात ७७ हजार ८०५ पथदीपांवर एलईडी दिवे बसविले आहेत. नाशिक रोड विभागात सर्वाधिक ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याखालोखाल सातपूर- ९७ टक्के, नवीन नाशिक- ९० टक्के, पंचवटी- ८४ टक्के, नाशिक पूर्व- ८३, तर नाशिक पश्चिम विभागात ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरअखेर सर्व एलईडी दिवे बसविण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा >  मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

विभागनिहाय बसविण्यात आलेले एलईडी दिवे 
विभाग पथदीप संख्या बसविलेले दिवे 

पंचवटी २०,८११ १७,५२१ 
पश्चिम ८,४९४ ६,९२६ 
पूर्व १२,०६५ १०,०७१ 
नाशिक रोड १४,२०९ १३,८८७ 
सिडको १८,७९१ १६,८७१ 
सातपूर १२,८८१ १२,५२९  

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Punitive action from December if LED is not installed nashik marathi news