Lockdown4.0 : "इमर्जन्सी फंड' उभारा..आर्थिक संकट टाळा"

Lockdown4.0 : "इमर्जन्सी फंड' उभारा..आर्थिक संकट टाळा"

नाशिक : एखाद्याची अचानक नोकरी गेली, अपघात झाला किंवा आजारपणातील खर्च अशा संकटाच्या काळात आपत्कालीन फंड अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो. पंतप्रधानांनी मध्यंतरी जन-धन योजनेच्या खात्यांमध्ये पाचशे रुपये जमा केले. मात्र कोरोनासारख्या महामारीची साखळी खंडित करण्यासाठी लॉकडाउन सुरू असूनही लोकांनी बॅंकांपुढे मोठी गर्दी केली. याचे कारण म्हणजे बहुतेकांकडे असा फंडच नसावा म्हणून त्यांनी केवळ पाचशे रुपयांसाठी जोखीम स्वीकारली होती, असेच म्हणावे लागेल.

जेव्हा एखादे आर्थिक संकट येते तेव्हा....

लॉकडाउनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचा पगार कमी झाला, उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांचे अर्थचक्र थांबले यामुळे अनेक जण आज आर्थिक तंगीमध्ये आहेत. याच्या उलट ज्यांनी इमर्जन्सी फंड तयार होता त्यांना मात्र सध्या तरी या अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीची झळ बसलेली नाही. कदाचित त्यांचा हा फंड संपेपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आलेली असेल. यावरून आपत्कालीन फंड किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. आपत्कालीन फंड हे असे खाते असते. ज्याच्यामध्ये दरमहिन्याला काही रक्कम जमा केली जाते आणि जेव्हा एखादे आर्थिक संकट येते. तेव्हा हा फंड वापरला जातो. तो पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंगचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. हा फंड नसेल तर अडचणीच्या काळात कोणत्याही व्यक्तीवर आर्थिक संकट कोसळू शकते. 

आपत्कालीन फंड किती असावा? 
प्रत्येक कुटुंबाच्या गरजेनुसार ही रक्कम वेगवेगळी असू शकते. साधारण आपला महिन्याचा खर्च किती आहे त्यानुसार ही रक्कम ठेवावी लागते. कमीत कमी सहा महिन्यांचा आपत्कालीन निधी उभारावा. समजा तुमचा महिन्याचा खर्च 15 हजार रुपये असेल तर 90 हजार रुपये (15,000x6 = 90,000) हा फंड असावा. जर तुमच्याकडे हा सहा महिन्यांचा फंड असेल तर तुम्ही कोणत्याही उत्पन्नाशिवाय हा खर्च पेलू शकता. 

फंड का हवा? 
अचानक येणाऱ्या आर्थिक संकटातून वाचण्यासाठी आपत्कालीन फंड अवश्‍य उभारावा. जसे की- 
1. एखाद्याची नोकरी अचानक जाणे. 
2. कुटुंबप्रमुखाचा अपघात होणे. 
3. अचानक घराची दुरुस्ती करावी लागणे. 
4. एखादी कामाची महागडी वस्तू नादुरुस्त होणे, हरवणे किंवा चोरी होणे. 

आपत्कालीन फंडाचे फायदे 
1. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक संकट आल्यावर सहजपणे त्यावर मात करता येते. 
2. तुम्ही एखादे उद्दिष्ट ठरविले असेल तर ते विनाव्यत्यय सहजपणे गाठता येते. 
3. हा फंड उभारल्यानंतर अचानक आलेल्या खर्चामुळे तुम्ही खच्चून जाणार नाहीत, तणावमुक्त राहाल. 
4. तुम्हाला वारंवार कुणाकडूनही उधार-उसनवारी करावी लागणार नाही. 

पैसे कसे आणि कुठे ठेवावेत? 
1. जर आपल्याला पैशांची तातडीची गरज भासली तर ते अगदी सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी ठेवावेत. 
2. तुम्ही जेथे पैसे ठेवत आहात ती बॅंक किंवा टपाल कार्यालय आपल्या घराच्या जवळ असावे. 
3. हे लक्षात ठेवा, की तुम्ही तुमच्या सर्वसाधारण बचत खात्यात आपत्कालीन फंड कधीही ठेवू नये. या फंडासाठी बॅंकेत किंवा टपाल कार्यालयात स्वतंत्र बचत खाते उघडण्याची गरज असते. 
4. या फंडात सहा महिन्यांच्या खर्चाचा एकरकमी निधी जमा करू नये. सहा महिन्यांच्या खर्चाचा फंड जमा होईपर्यंत दरमहिन्याला काही ठराविक रक्कम बाजूला काढून बचत करावी. 
5. जर आपत्कालीन निधीमधून काही रक्कम काढली असेल तर गरज भागल्यानंतर ती रक्कम त्वरित या फंडामध्ये जमा करावी. एक लक्षात ठेवा, खूपच तातडीची गरज असेल तरच हा फंड काढावा अन्यथा विसरून गेलेलेच बरे. 
6. हा फंड प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटशी संबंधित ठिकाणी ठेवू नये. कारण त्याची गरज पडल्यावर प्रॉपर्टी लगेच विकली जात नाही किंवा मार्केट खाली गेलेले असेल तर कमी भावात शेअर विकावे लागल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

तज्ज्ञ म्हणतात...

आपत्कालीन फंड उभारण्यासाठी महिन्याच्या उत्पन्नातून किमान 10 ते 15 टक्के रक्कम बाजूला काढायला हवी. यासाठी पोस्ट किंवा बॅंकेच्या रिकरिंगचा पर्याय निवडू शकता. कारण व्याजही चांगले मिळते. आपल्या घरात लग्नकार्य किंवा आजारपणाचा अचानक खर्च उद्‌भवला तर या फंडाचा उपयोग होतो. या कारणांसाठी बॅंकांमध्ये अगदी सहजपणे कर्ज उपलब्ध होत नाही म्हणून आपत्कालीन फंडाचे महत्त्व ओळखावे. - सुधाकर पाटील, निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक, बॅंक ऑफ इंडिया 

प्रत्येक कुटुंबप्रमुखाने किमान सहा महिन्यांचा घरखर्च बाजूला काढायलाच हवा. त्याची इतर कुठे गुंतवणूक न करता, सेव्हिंग खात्यात किंवा लिक्विड फंडात ठेवावा. व्यावसायिकांनी व्यवसाय व घरखर्चासाठी वेगवेगळा फंड उभारावा. व्यवसायासाठीचा फंड करंट अकाउंटमध्ये न ठेवता ओव्हरनाइट फंडात ठेवावा. - उन्मेष देशमुख, गुंतवणूक सल्लागार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com