"खडसेंनी जरी पक्ष सोडला, तरी रक्षा खडसे भाजप सोडणार नाही"

संपत देवगिरे
Wednesday, 21 October 2020

"नाशिकचा कोणीही कार्यकर्ता, नेते किंवा पदाधिकारी एकनाथ खडसेंसोबत जाणार नाही. एव्हढेच काय खासदार रक्षा खडसे देखील भाजप सोडणार नाही, कारण त्यांना राजकीय भविष्याची जाण आहे,"

नाशिक : "नाशिकचा कोणीही कार्यकर्ता, नेते किंवा पदाधिकारी एकनाथ खडसेंसोबत जाणार नाही. एव्हढेच काय खासदार रक्षा खडसे देखील भाजप सोडणार नाही, कारण त्यांना राजकीय भविष्याची जाण आहे," असा दावा भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार यावर आज अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले. त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

नाशिकमधून भाजपचे कोण नेते खडसेंसोबत जाणार?

एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना जेव्हढी संधी भारतीय जनता पक्षात आहे, तेव्हढी अन्यत्र कोणत्याही राजकीय पक्षात नाही. आहेत, याचे दुःख आहे. असेही पालवे यावेळी म्हणाले. खडसे हे जळगावचे असले तरी एकेकाळी त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राचा कारभार होता. त्यामुळे सहजीकच जळगवासह उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक व स्थानिक सत्तेच्या समिकरणांवर परिणाम होणार आहे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात लेवा पाटील समाज तसेच जळगावशी संबंधीत नागरिक, कार्यकर्ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे नाशिकमधून भाजपचे कोण नेते खडसेंसोबत जाणार याची चर्चा सुरु झाली. यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, "आम्ही सर्वांच्या संपर्कात आहोत. कालच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्याशी संपर्क केला होता. त्यामुळे भाजपचा कोणीही कार्यकर्ता, पदाधिकारी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाणार नाही.'

खडसेंनी पक्ष सोडल्याचे दु:ख- पालवे

राज्यात व देशात भाजपची सत्ता- समिकरणे, लोकांमधील प्रतिमा आणि बांधणी विचारात घेता, भाजप सोडून जावी अशी काहीही स्थिती नाही. पक्षांतर हा श्री. खडसे यांचा वैयक्तीक व व्यक्तीगत निर्णय आहे. देशात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात सर्वाधीक संधी केवळ भाजप पक्षातच आहे. अन्य कोणत्याही पक्षात नाही. याची जाणीव असल्याने कोणीही कार्यकर्ता भाजप सोडणार नाही. भाजपचा कार्यकर्ता विचारसरणीने पक्षाशी जोडलेला असतो. त्यामुळे खडसे पक्ष सोडताहेत याचे वाईट वाटते. मात्र स्वतः खासदार रक्षा खडसे देखील त्यांच्यासोबत जाणार नाही. त्या भाजपमध्येच राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raksha Khadse will not leave BJP nashik marathi news