आरबीआयच्‍या गोल्ड बॉण्डला वाढता प्रतिसाद; घसघशीत परताव्याचा दावा 

The Reserve Bank of India's Gold Bond
The Reserve Bank of India's Gold Bond

नाशिक : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गोल्ड बॉण्डला शहरासह जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. टपाल खात्यातर्फे राबविण्यात येत असलेल्या या योजनेत गुंतवणूकदारांना घसघशीत परवाना देण्याचा दावा केला जातोय. सोमवार (ता. २८)पासून या योजनेला सुरवात झाली असून, येत्‍या ३ जानेवारीपर्यंत यात गुंतवणुकीची संधी उपलब्‍ध असणार आहे. 

गुंतवणुकीचा विषय आला तर अनेकांचा कल शक्यतो सोने खरेदीकडेच असतो. शेअर मार्केट कडाडले असतानाच, सोन्याच्या भावाने ५० हजार रुपये तोळ्याचा टप्पा ओलांडला होता, पण सामान्यांना एक ग्रॅम सोने घेणेही कठीण असताना, खरेदीनंतर जतन करण्यातही जोखीम असतेच. त्या पार्श्‍वभूमीवर टपाल खात्याच्या सहकार्याने आरबीआयने आणलेल्या गोल्ड बॉण्डमध्ये पैसे गुंतवणुकीचा सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रस्तुत गुंतवणुकीत आरबीआय सोन्याचा विशिष्ट दर ठरवून देते. त्यानुसार गुंतवणूक निश्‍चित केली जाते. संबंधितांकडून गुंतविलेल्या रकमेवर गुंतवणुकीनंतर आठ वर्षांनी सोन्याला बाजारात जो दर आहे, त्यानुसार परतावा दिला जातो. सध्या ही योजना मुख्य टपाल कार्यालयापुरतीच मर्यादित आहे. त्यासाठी संबंधित गुंतवणूकदाराला आधार, पॅनकार्डसह संबंधित बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत आवश्‍यक आहे. 


काय आहे योजना? 

या योजनेसाठी सोन्याच्या प्रचलित भावानुसार किमान एक ग्रॅम सोन्याइतकी रक्कम गुंतवणूक करावी लागते. कमाल गुंतवणुकीसाठी कुठलीही मर्यादा नाही. त्यासाठी टपाल खाते संबंधित गुंतवणूकदाराला गुंतविलेल्या रकमेचे प्रमाणपत्र देते. योजनेसाठी आठ वर्षांचा कालावधी असला तरी गुंतवणूकदार पाच वर्षांनंतर त्यातून बाहेर पडू शकतो. यासाठी सहामाहीसाठी किमान अडीच टक्के व्याजदराची निश्‍चिती केली आहे. योजनेतील व्याज सहा महिन्यांनी संबंधिताच्या खात्यात जमा होते. विशेष म्हणजे गुंतवणूकदार आपल्याकडील गोल्ड बॉण्ड तारण ठेवून इतर बँकांकडून कर्जही मिळवू शकतो. योजनेतील मुद्दल रकमेवर प्राप्तिकर सूट नाही, मात्र मिळणारे व्याज करमुक्त आहे. योजनेत पाच हजारांपासून एकरकमी कितीही रक्कम जमा करण्यास परवानगी असल्याने सर्वसामान्यांना योजनेत सहभागी होणे सहज शक्य आहे. 

योजनेची वैशिष्ट्ये

१) व्याजदर संपूर्ण करमुक्त. 
२) गोल्ड बॉण्ड बँकांत तारण ठेवण्याची सुविधा. 
३) छोट्या रकमेसह एकरकमी पैसे जमा करण्याची सुविधा. 
४) नॉमिनी (वारस) लावण्याची सोय. 
५) बॉण्ड स्वरूपात असल्याने चोरी होण्याची शक्यता नाही. 
६) संबंधित व्यक्तीच्या खात्यात थेट व्याज जमा. 

आरबीआयच्या गोल्ड बॉण्डला मोठा प्रतिसाद आहे. विशेष म्हणजे गुंतवणूकदारांसमोर एक ग्रॅमपासून एकरकमी गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. 
-मोहन अहिरराव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com