शेतकरी म्हणताएत...'खुल्या पद्धतीने आणलेल्या कांद्याची खरेदी करा!'

4Onion_92.jpg
4Onion_92.jpg

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाच्या उपाययोजनांच्या पार्श्‍वभूमीवर निर्यातीसाठी "पॅनिक' खरेदी झाल्याने मध्यंतरी कांद्याला चांगला भाव मिळाला. पण आता देशांतर्गत अन्‌ निर्यातीसाठीची साखळी खंडित झाल्याने लाल कांद्याचे भाव गडगडले आहेत. कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात लाल कांदा सहाशे ते सातशे रुपये क्विंटल सरासरी भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

निर्यातीचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपर्यंत घसरले

खबरदारीची उपाययोजना म्हणून व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर उपाय म्हणून गोणीमधून आणलेला कांदा खरेदी करण्याचा मधला मार्ग प्रशासनातर्फे काढण्यात आला होता. आता मात्र भाव गडगडू लागल्याने गोणीने आणलेल्या कांद्यामुळे नुकसान होऊ लागल्याने खुल्या पद्धतीने आणलेल्या कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे. कांद्याच्या आगरात मार्च ते सप्टेंबर या कालावधीत बाजार समित्यांमधून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्यापैकी 50 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत कांदा निर्यात आणि देशांतर्गत पाठविला जातो. स्थानिक ग्राहकांसाठी 30 टक्के विकला जातो. सद्यःस्थितीत निर्यातीचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपर्यंत घसरले असून, स्थानिक बाजारपेठेतील मागणी घटली आहे. 

जळगाव-सोलापूरमध्ये 700 रुपयांचा भाव 

जळगाव आणि सोलापूरमध्ये शुक्रवारी (ता. 3) सरासरी 700 रुपये क्विंटल भावाने कांदा विकला गेला. मनमाडमध्ये 700, येवल्यात 721, नांदगावमध्ये 620, तर पिंपळगावमध्ये एक हजार रुपये क्विंटल असा लाल कांद्याचा भाव राहिला. पिंपळगावमध्ये उन्हाळ कांद्याच्या भावात 24 तासांत 50 रुपयांनी घसरण होऊन एक हजार 451 रुपये क्विंटल असा भाव निघाला. उन्हाळ कांद्याला मनमाडमध्ये बाराशे, येवल्यात 950, नांदगावमध्ये बाराशे रुपये क्विंटल असा भाव होता. कोल्हापूरमध्ये 100 रुपयांची 24 तासांत घसरण झाली आणि शुक्रवारी चौदाशे, पुण्यात एक हजार 150 रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांदा विकला गेला. मुंबईत एक हजार 650 रुपये क्विंटल असा भाव स्थिर राहिला आहे. 

पुरवठा व्यवस्थेतील अडथळे 

-देशांतर्गत आणि परदेशातील व्यापाऱ्यांकडून पैसे मिळणे झाले मुश्‍कील
-निर्यातीच्या कांद्याचे जहाज रवाना होण्यासाठी चार ते पाच दिवसांचा विलंब 
-हॉटेल-पंक्‍चर दुकाने उघडी नसल्याने ट्रकचालक कांदा नेण्यास होईनात राजी 
-गोण्या व मजुरांच्या चणचणीमुळे व्यापारी झाले हतबल 

सिंगापूरमध्ये दुसरा लॉकडाउन सुरू झाला. तसेच श्रीलंकेत संचारबंदी, मलेशियातील लॉकडाउन 20 एप्रिलपर्यंत, दुबईत लॉकडाउन अशी स्थिती आहे. त्याचबरोबर पूर्वीचा कांदा शिल्लक असल्याने नव्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी होण्याचा वेग मंदावला आहे. अशी विविध कारणे कांद्याची पुरवठा साखळी खंडित होण्यामागे आहेत. - विकास सिंह, कांदा निर्यातदार  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com