गोदावरीतील पाणवेली नष्ट करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा - विभागीय आयुक्त

radhakrishna-game.jpg
radhakrishna-game.jpg

नाशिक : गोदावरी आणि गोदावरीच्या उपनद्यांमध्ये पाणवेलींमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. पाणवेली नष्ट करण्यासाठी यंत्रणांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे आदेश गुरुवारी (ता. ७) येथे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या ऑनलाइन बैठकीत ते बोलत होते. 

गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीची ऑनलाइन बैठक 

करमणूक शुल्क विभागाचे उपायुक्त दत्तात्रय बोरुडे, नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक प्रतिभा भदाणे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, याचिकाकर्ते राजेश पंडित, निशिकांत पगारे आदी उपस्थित होते. गमे म्हणाले, की जिल्हा परिषदेंतर्गत गोदावरी नदीकाठच्या व प्रदूषण समितीमधील गावांचा समावेश ‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये करण्यात यावा, तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर या गावातील सांडपाणी नियोजन करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी करण्यात यावा. जिल्हा परिषदेच्या कामांचे ‘डॉक्युमेंटेशन’ करण्यात यावे जेणेकरून उच्च न्यायालयासमोर अहवाल सादर करणे सहज शक्य होईल.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे

महापालिकेच्या उपसमितींतर्गत गोदावरी प्रदूषण नियंत्रणाच्या कामांचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करताना जिल्ह्यातील खासदारांची मदत घेण्यात यावी, तसेच औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्सिट्यूट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक महापालिका आयुक्तांनी घ्यावी. त्याचप्रमाणे उच्च गोदावरी प्रदूषण टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचनाही गमे यांनी दिल्या आहेत. 

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आराखडा तयार

प्लॅस्टिक प्रदूषण नियंत्रणाबाबत महसूल यंत्रणा, जिल्हा परिषद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने एकत्रितरीत्या कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी स्पष्ट केले. गोदावरी नदीकाठावरील ३२ गावे व प्रदूषण समितीधील आठ गावे अशा एकूण ४० गावांचा समावेश स्वच्छ भारत मिशनअंतर्गत करण्यात आला असून, या गावातील स्वच्छतेच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा जानेवारीच्या अखेरपर्यंत तयार करण्यात येणार आहे. ओढा व एकलहरे येथे सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाच्या जनजागृतीसाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती श्रीमती बनसोड यांनी दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com