Republic Day 2020 : लोकशाहीची मूल्ये रुजविताना "त्यांनी' खर्ची घातले आयुष्य   

republic day.jpg
republic day.jpg

नाशिक : देशाचे प्रजासत्ताक नागरिकांत रुजविताना लोकशाही, समाजवाद, समता, बंधुता, विज्ञानाधिष्ठित समाज यांसह खादी, स्वदेशी, विज्ञानाधिष्ठित समाज या मूल्यांचा अंगीकार मूलभूत आहे. ही मूल्ये समाजात रुजविण्यासाठी अनेकांनी आयुष्य वेचले. यामध्ये नाशिकचे वसंत हुदलीकर, वासंती सोर, डॉ. ठकसेन गोराणे यांचा अग्रक्रमाने उल्लेख होतो. त्यांचे अविश्रांत योगदान, विचारांवरील श्रद्धा यातून अखंड प्रकाशित हे दीपस्तंभ समाजाला निश्‍चितच दिशादर्शक ठरले आहेत. 
 
स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर 
समाजवादावर अढळ श्रद्धा असलेले श्री. हुदलीकर सेवादलाच्या माध्यमातून गेली पाऊणशे वर्षे कार्यरत आहेत. समाजवादी विचारांशी बांधिलकी असलेल्या व तो समाजात रुजविण्यासाठी अखंड कार्यरत असलेल्यांत त्यांचा अग्रक्रमाने उल्लेख होतो. जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. विद्यार्थिदशेपासून ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. स्वातंत्र्योत्तर काळात गोवामुक्ती संग्राम आणि 1975 मध्ये सरकारने जाहीर केलेल्या आणीबाणीविरोधात ते पुढे होते. त्यांनी आयुष्यभर खादीचा वापर करण्याचा निश्‍चय केला व तो पाळला. काळ, वेळ, सवयी, समाज बदलला. मात्र, हुदलीकर आजही त्यांच्या विचारांवर व त्याच्या प्रसारावर ठाम आहेत. आजही त्यांचा दिवस हुतात्मा स्मारकातील ग्रंथालय, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नव्या पिढीवर संस्कार रुजविण्यात व्यतीत होतो. एस. एम. जोशी, साने गुरुजी यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी सेवा दलाचा संस्कार अंगीकारला. त्यांच्या कडक शिस्तीमुळेच नाशिकचे हुतात्मा स्मारक सुस्थितीत असलेले राज्यातील एकमेव स्मारक आहे. दर वर्षी पाच-पंचवीस गरीब विद्यार्थी येथे अभ्यास करून मोठ्या पदांवर पोचतात. स्वातंत्र्य, समाजवाद, अंधश्रद्धा याविरोधात त्यांनी कायम कणखर भूमिका घेतली. विशेषत: बुवाबाबांच्या पायावर डोके ठेवणाऱ्यांचा त्यांना तिटकारा आहे. अशांचे प्रबोधन केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. याप्रकारे विवेकवादी विद्यार्थी चळवळीसाठी यांनी कायम योगदान दिले. त्यांच्या सेवा दलाचे संस्कार, स्वदेशी, राष्ट्रभक्ती, समाजवाद, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठीची सत्तरी त्यांनी पूर्ण केली. अद्यापही त्यांचे हे कार्य अविरत सुरू आहे. त्यासाठी ते राज्यभर ख्यातनाम आहेत. 

वासंती सोर (ज्येष्ठ गांधीवादी नेत्या) 
"खादी सर्व समस्यांवरचा रामबाण मार्ग आहे.' यावर वासंती सोर यांची श्रद्धा आहे. बालपणापासून अखंड सत्तर वर्षे राष्ट्रपिता महात्मा गांधीचे आचारण-विचार समर्थपणे पुढे नेण्याचे काम त्या करीत आहेत. नाशिकमधील ज्येष्ठ सर्वोदयी नेत्या म्हणून त्यांचे योगदान ख्यात आहे. त्यांचा जन्मच महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमात झाला. जन्मानंतर त्यांना खादीच्या वस्त्रावरच ठेवले. तेव्हापासूनचे हे नाते अखंड आहे. त्या आजपर्यंत सर्वोदयी जीवनपद्धतीचे आचरण करतात. आजच्या स्थितीतही विविध समस्यांवर चपखल उत्तर म्हणजे खादी, हा त्यांचा विश्‍वास आहे. 
त्या म्हणतात, की मी जन्मापासूनच खादी वापरते. जन्मानंतर ज्या कपड्यात चिमुकल्या जिवाला गुंडाळलं जातं, तो कपडाही खादीचा होता. माझे आई-वडील माझ्या जन्माच्या 11 वर्षे आधीपासून वर्धा आश्रमात होते. त्यामुळे आमच्या घरात खादीशिवाय दुसऱ्या कापडाची चिंधीही नव्हती. मी खादी वापरतेच; पण माझ्या वापरासाठी कपड्याचं सूतही मी चरख्यावर कातते. इतरांनाही चरख्याचं प्रशिक्षण देते. खादी वापरणारे आज फारच कमी आहेत. एकविसाव्या शतकात खादीही बदलली. मात्र, आजही खादी वापरणे कसे गरजेचे आहे, हे लोकांना सांगावे लागेल. त्यातून लोक पुन्हा खादीकडे वळतील. जागतिक स्तरावर ऊर्जा, पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती संपण्याच्या मार्गावर आहे. ही समस्या उग्र होत आहे. खादी या तिन्ही समस्या सौम्य करते. कारण खादीच्या निर्मितीतून मिलच्या कपड्यांच्या तुलनेत खूप कमी ऊर्जा, पाणी लागते. आधिक निर्मिती, आधिक उपभोग, नैसर्गिक साधान संपत्तीचा आधिक वारेमाप वापर या त्रिसूत्रीत खादी बसत नाही. गरजेपुरती निर्मिती, उपभोगावर मर्यादा आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा आवश्‍यक तेवढाच वापर ही खादीची त्रिसूत्री आहे. पर्यावरण विनाश, प्रदूषणाने जगणे अवघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये चरख्यावर सूत कातून तेच कपडे वापरणाऱ्यांचे कताई मंडळ आहे. त्याच्या त्या मार्गदर्शक आहेत. खादीविषयी त्यांची निष्ठा अतुल्यच आहे. 

डॉ. ठकसेन गोराणे 
अंधश्रद्धा निर्मूलन हे भारतीय राज्यघटनेतील प्रमुख मूल्य समाजात रुजविताना, स्वतः त्याचा अंगीकार करण्याचे काम ते करतात. विज्ञाननिष्ठ समाजरचना यावर अनेकांनी आयुष्य वेचले. अंधश्रद्धेविरोधात प्रहार करीत विवेकवादी समाजनिर्मितीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मोठे योगदान राहिले आहे. पुण्याच्या शाळेत मुख्याध्यापक असताना संविधानाचा सरनामा मुलांना मुखोद्‌गत असला पाहिजे, असा ध्यास त्यांनी घेतला. विद्यार्थ्यांकडून तो पाठ करवून घेतला. विविध यात्रोत्सवातील पशुहत्या, बोकडबळी विरोधात ते सातत्याने संघर्ष व प्रबोधन करीत आहेत. त्यासाठी अनेकदा त्यांना अंधश्रद्धाळूंच्या प्रतिकारालाही सामोरे जावे लागले. मात्र, भारतीय संविधानाविषयी बांधिलकी निर्माण करण्यासाठी त्यांनी सहकारी घडवले. प्रा. सुदेश घोडेराव व अन्य असंख्य कार्यकर्ते आता त्यांचे काम अधिक जोमाने पुढे नेत आहेत. अनेकांनी त्यासाठी वाहून घेतले आहे. हे त्यांच्या एकाग्रता व निष्ठेचे यश आहे. 2007 पासून त्यांची समिती संविधान बांधिलकी महोत्सव राबवीत आहे. स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, अंधश्रद्धा याविषयी प्रबोधन करीत आहे. वैयक्तिक आयुष्यात सत्यशोधकी पद्धतीने मुलीचा विवाह करीत वैचारिकतेला कृतिशील आचरणाची जोड त्यांनी दिली आहे. त्यांनी संविधानातील मूल्यांवर विद्यार्थ्यांना बोलते केले. कार्यकर्ता आणि शिक्षक म्हणून स्वातंत्र्याची मूल्य स्वत:तच रुजविली पाहिजे. स्वातंत्र्य व संविधानाचा, मूल्य- समता- स्वातंत्र- न्याय हा विचार स्वतःत उतरविला पाहिजे. याविषयी ते म्हणाले, की समाजात हे विचार घेऊन लोक कसे "अंनिस'मध्ये आल्यावर समता, समानता, न्याय- बंधुता आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्‍वांशी तादात्म्य पावतात. सामाजिक न्यायाची भूमिका, मैत्री, बंधुभाव जपतात, हेच शिकविण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. संविधानाचे मूल्य जपणे हेच खरे स्वातंत्र्य, असे आम्ही मानतो. हा विचार आजही योग्य, कालसंगत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com