समृद्धीने लावली ग्रामीण रस्त्यांची वाट! प्रशासकीय यंत्रणांचे मात्र दुर्लक्षच; नागरिकांचा संताप

damaged road sinnar
damaged road sinnar

नाशिक/सिन्नर : फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प असणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग ठाकरे सरकारने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कंबर कसली आहे. राज्याची राजधानी व उपराजधानी जोडणाऱ्या या महामार्गाच्या कामामुळे ग्रामीण रस्त्यांची मात्र पुरती वाट लागली आहे. 

वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हे

सिन्नर तालुक्यात महामार्ग जाणाऱ्या भागातील कच्च्या व पक्क्या रस्त्यांवरून ठेकेदाराच्या अवजड वाहनांची रात्रंदिवस वर्दळ होत असल्याने रस्ते खचण्याचे प्रमाण वाढले आहे. तर सुस्थितीत असणाऱ्या रस्त्यांचे डांबर उखडल्याने त्यांचा वापर स्थानिकांच्या जीवावर बेतणारा ठरला आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेला महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारासोबतच स्थानिक प्रशासकीय यंत्रणा देखील कारणीभूत ठरल्या आहेत. समृद्धीच्या कामावर धावणाऱ्या वाहनांचा भार सहन करण्याची क्षमता मुळातच या रस्त्यांमध्ये नाही. त्याबद्दल ओरड केली तर पोलीस, महसूल यंत्रणांचा पद्धतशीर वापर ठेकेदाराकडून करण्यात येतो. वाहनांची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार ग्रामीण भागातील जनता सहन करते आहे.

शिवार रस्ते उद्धवस्थ

सिन्नर तालुक्यात पाथरे, वावी, गोंदे, डुबेरे, शिवडे, आगासखिंड या भागातून समृद्धी महामार्ग जातो. आज घडीला या परिसरातील सर्वच रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. मुळातच या रस्त्यांची बांधणी हलक्या व कमी भार क्षमता असणारी वाहने लक्षात घेऊन करण्यात आली आहे. खडीकरण केलेल्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून डांबरीकरणाचे अस्तर निघाल्याने सर्वच रस्त्यांवरून चालणे वाहन चालकांसाठी जिवावर बेतणारे ठरले आहे. सिन्नरच्या पूर्वेकडील वावी -घोटेवाडी-निमोण, मलढोण-देवकौठे, देवपूर-पांगरी, पांगरी-मर्हळ, वावी-दुशिंगवाडी-सायाळे, वावी-शहा या रस्त्यांसह सर्वच शिवार रस्ते समृद्धी कामावरील वाहनांनी उद्धवस्थ केले आहेत.
 

कोकाटे यांच्या सूचनेला केराची टोपली ?

सिन्नर तालुक्यात समृद्धी महामार्ग, सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामामुळे बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी न करता ते डांबरी बनवावेत व प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यावर त्यांचे पुन्हा मजबुतीकरण करावे. दि.15 ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण न केल्यास समृद्धी अथवा शिर्डी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल असा अल्टीमेटम आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिला होता. मात्र,त्यांच्या या सूचनेला उभय प्रकल्पांच्या ठेकेदारांनी केराची टोपली दाखवली आहे. याच संदर्भात आठवडाभरात बांधकाम मंत्र्यांच्या दालनात बैठक होणार असल्याचे आ.कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयातून सांगण्यात आले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com