आरटीईचे जिल्ह्यात झाले 'इतके' प्रवेश..पालकांसाठी सूचना जारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्‍के राखीव जागांसाठी मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परीस्थितीत प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले असून, सोडतीत नावे आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत माहिती एसएमएसद्वारे कळविले जाते आहे. यानंतर थेट शाळेत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे.

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये पंचवीस टक्‍के राखीव जागांसाठी मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परीस्थितीत प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले असून, सोडतीत नावे आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत माहिती एसएमएसद्वारे कळविले जाते आहे. यानंतर थेट शाळेत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे.

पालकांची शाळांमध्ये हजेरी

गेल्या मार्च महिन्यात आरटीईअंतर्गत पंचवीस टक्‍के जागांवर शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या प्रवेशासाठी सोडत जाहीर केली होती. मात्र त्यानंतर कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परीस्थितीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामूळे ही प्रवेश प्रक्रिया रखडली होती. आता टप्या-टप्याने जनजीवन सुरळीत होत असतांना, प्रवेश प्रक्रियेलाही गती प्राप्त झालेली आहे. पहिल्या काही दिवसांत प्रवेश प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. परंतु आता पालक प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळांमध्ये हजेरी लावत आहेत. 

नाशिक जिल्ह्यात 103 विद्यार्थ्यांचे प्रवेश 
नाशिक जिल्ह्यातील 447 खासगी शाळांमध्ये 5 हजार 557 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी 17 हजार 630 अर्ज ऑनलाइन स्वरूपात प्राप्त झाले होते. यापैकी 5 हजार 307 विद्यार्थ्यांचे नाव सोडतीत जाहीर करण्यात आले होते. प्रारूप स्तरावर 1 हजार 858 प्रवेश झालेले असले तरी प्रत्यक्षात 103 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झालेले आहे. राज्याचा विचार केल्यास वर्धा 216 तर जळगाव जिल्ह्यात 206 प्रवेश निश्‍चित झाले आहेत. सर्वात कमी सर्वात पुणे जिल्ह्यात अवघ्या एका विद्यार्थ्याचे प्रवेश निश्‍चित झालेले आहे. 

हेही वाचा >ह्रदयद्रावक! पुत्रवियोगाचा धक्का..अवघ्या अर्ध्या तासातच मातेचाही जगाचा निरोप.. गावात हळहळ 

अशा आहेत पालकांना सूचना 
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी सोडतीत नावे असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेने दिलेल्या तारखेला शाळेत जाऊन प्रवेश निश्‍चित करायचे आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकावर मॅसेजद्वारे कळविले आहे. तरीदेखील पालकांनी आरटीई पोर्टलवर आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाची तारीख या पर्यायाद्वारे अधित तपशील जाणून घेता येणार आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये. तसेच प्रवेश घेण्यासाठी जातांना बालकांना आपल्यासोबत नेऊ नये. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 

हेही पाहा > VIDEO : जेव्हा सुनीता ताईंकडून नकळत झाले कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार...पाहा थरारक आपबिती.. 

या कागदपत्रांची आवश्‍यकता 
पालकांनी शाळेत प्रवेशासाठी जातांना कागदपत्रे सोबत न्यायची आहेत. यात प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, आरटीई पोर्टलवरील "हमी पत्र आणि अर्जाची स्थिती' या पर्यायावर क्‍लिक करून हमी पत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे. प्रतिक्षा यादीमधील पालकांनी प्रवेशासाठी सध्या शाळेत गर्दी करू नये. त्यांना स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर केल्या जाणार असल्याचे नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE admission process started in maharashtra Marathi News