Sakal Impact: रुग्णालयांवर वॉच साठी महापालिकेचे ऍप सहा भरारी पथके 

watch.jpg
watch.jpg

रुग्णालयांवर वॉच साठी महापालिकेचे ऍप   


खासगी रुग्णालयांवर नजर ठेवण्यासाठी सहा भरारी पथके 

वाढीव बिलांच्या आतापर्यंत तीन तक्रारी 
दोन बड्या रुग्णालयांची चौकशी 
सरकारकडून निर्धारित दरानेच उपचाराचे निर्बंध 
रुग्ण-नातेवाइकांसाठी दोन दिवसांत ऍप 

सकाळ वृत्तसेवा 
नाशिक ः कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या भीतीचा गैरफायदा खासगी रुग्णालयांनी घेऊ नये, यासाठी नाशिक महापालिकेने कठोर पावले उचलली असून, रुग्णालयांकडून आकारणी केल्या जाणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांवर, सोयी-सुविधांवर नजर ठेवण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक विभागात एक अशी सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड, उपचार घेत असलेले रुग्ण व अन्य माहिती नागरिकांना तत्काळ मिळावी यासाठी एका ऍपची निर्मिती केली असून, येत्या दोन दिवसांत नाशिककरांना अँड्रॉइड मोबाईलवर ते उपलब्ध होईल. 
महाराष्ट्र सरकारने कोविड-19 संसर्ग तसेच अन्य आजारांवर उपचाराचे दर गेल्या 21 मेस एका परिपत्रकाद्वारे निश्‍चित केले आहेत. मुंबई-ठाण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये खाटांच्या संख्येच्या आधारे नाशिकमध्ये 75 ते 60 टक्‍के इतक्‍या बिलाचे बंधन टाकण्यात आले असून, त्यानुसारच खासगी रुग्णालयाकडून आकारणी केली जात आहे की नाही, हेही पथके तपासतील, अशी माहिती महापालिका आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 
लॉकडाउन-5 दरम्यान शिथिलता मिळाल्यानंतर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ती आता बाराशेच्या पुढे गेली असून, सोमवारअखेर 68 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेने स्वत:च्या रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांना सोबत घेऊन कोरोना रुग्णांसाठी एक हजाराहून अधिक खाटांची व्यवस्था केली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमधील बेड फुल होत असून, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. काही रुग्णालयांकडून अवघ्या दहा दिवसांची पाच ते सहा लाख रुपये आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. आवश्‍यकता नसताना व्हेंटिलेटरचा वापर करणे, डॉक्‍टरांच्या व्हिजिट, पीपीई किट, इंजेक्‍शन, गोळ्या व औषधांच्या रूपाने लाखोंच्या बिलांमुळे नातेवाईक त्रस्त आहेत. या संदर्भात मंगळवारच्या अंकात "सकाळ'मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल महापालिकेने घेतली आहे. खासगी रुग्णालयांवर नियंत्रणासाठी अनेक पावले उचलली आहेत. 
बेडसंख्येवर खास "वॉच' 
पूर्व, पश्‍चिम, पंचवटी, सातपूर, सिडको व नाशिक रोड या शहरातील सहा विभागांमध्ये प्रत्येकी चार कर्मचाऱ्यांचे पथक खासगी रुग्णालयांवर नजर ठेवण्यासाठी नियुक्त केले आहे. हे पथक संबंधित रुग्णालयाने रेकॉर्डवर दाखविलेल्या व प्रत्यक्ष वापरात असलेल्या बेडची संख्या, उपचार घेणारे कोविड-नॉनकोविड रुग्ण आदी माहिती घेईल व विसंगती आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. जी. सोनकांबळे यांनी दिली. महापालिकेकडे दोन बड्या रुग्णालयांनी अनुक्रमे 1.65 लाख व 3.15 लाख वसूल केल्याच्या तक्रारी आल्या असून, त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 
ऍप देणार रिअल टाइम अपडेट 
काही खासगी रुग्णालयांच्या दुकानदारीच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन महापालिकेने एका ऍपची निर्मिती केली असून, दोन दिवसांत सर्व संबंधित रुग्णालयांना ते ऍप डाउनलोड करणे बंधनकारक केले जाणार आहे. या ऍपवर रुग्णालयांची माहिती, बेडची संख्या, उपचार घेत असलेले रुग्ण, डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण आदींची माहिती रिअल टाइम अपडेट होणार आहे. 


तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक 
राज्य शासनाने 21 मेस परिपत्रक काढून खासगी रुग्णालयांना नॉन-कोरोना व कोरोना अशा सर्व रुग्णांच्या उपचारात आकारावयाच्या बिलांचे निर्बंध टाकले आहेत. त्यापेक्षा अधिक बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिला आहे, तर मुख्य सचिव अजोय मेहता यांनी तर सोमवारी एका मुलाखतीत वेळ पडली तर रुग्णालयांमध्ये प्राप्तिकर अधिकारी नेमण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार, मुंबई, ठाणे येथे निर्धारित केलेल्या दराच्या शंभर टक्‍के आकारणी करता येईल, तर नाशिकमध्ये 50 पेक्षा कमी खाटांच्या रुग्णालयात 60 टक्के, 50 ते 100 बेडच्या रुग्णालयात 67.5 टक्के आणि 100 पेक्षा अधिक खाटा असलेल्या रुग्णालयात त्याच्या 75 टक्के बिले लावता येतील. ही माहिती महापालिकेच्या www.nmc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रत्येक रुग्णालयात तक्रारपेटी ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय 0253- 2317292 व 9607432223 या भ्रमणध्वनी क्रमांकावर नागरिकांना तक्रार करता येईल. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com