VIDEO : चांदवडला बोगस खतांची विक्री; शेतकऱ्यांच्या समयसूचकतेने धक्कादायक प्रकार उघडकीस

bogus khat chandwad 1.jpg
bogus khat chandwad 1.jpg

गणूर (जि.नाशिक) : चांदवडला बोगस खत गोण्यांचा प्रकार तरुण शेतकऱ्यांच्या समयसूचकतेने उघड झाला आहे. याबाबत संबधित शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर सदर खतांचे नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अगोदरच आर्थिक गणितं जुळविताना तारेवरची कसरत करणाऱ्या शेतकऱ्यांना बहुउद्देशिय म्हणविल्या जाणाऱ्या संस्थांकडून फसवणूक पदरी पडत असल्याने याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण तयार झाले.

शेतकऱ्यांसह दुकान गाठले

भरत कोतवाल राहणार चांदवड यांनी चांदवड-मनमाड रस्त्यावरील इंदुमती बहुउद्देशिय संस्थेच्या दुकानातून इफको कंपनीची एनपीके १२-३२-१६ ही खताची गोणी ११८० रुपयांना खरेदी केली.शेतात गोणी फोडताचं दाणेदार खतांऐवजी दगड, कोंबडीचे पीस, रबर, पिशव्या असा अतिरिक्त कचरा त्यात आढळून आला. याबाबत त्यांनी तात्काळ संबंधित विक्रेत्याशी फोनवरून संपर्क साधला असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. कोतवाल यांनी लगेच काही शेतकऱ्यांसह दुकान गाठत विक्रेत्याच्या हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतरही विक्रेत्याची अरेरावी सुरू असल्याने थेट कृषी अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आणून देण्यात आला. 

नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
शेतकऱ्यांची तक्रार येताच तालुका कृषी अधिकारी व्ही. एस. सोनवणे व पंचायत समिती कृषी अधिकारी आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी दुकानात विक्रीसाठी आणलेल्या चार गोण्या फोडण्यात आल्या असता, दाणेदार खतांऐवजी दगड, प्लॅस्टिक, कोंबडीचे पीस व कचरा आढळून आला. शिवाय चारही खतांच्या रंगात देखील फरक आढळून आल्याने याबाबतचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. 

विक्रेत्यांवर कारवाईची मागणी 

दरम्यान या सर्व प्रकारात शेतकऱ्यांचा मात्र मोठा संताप झालेला दिसून आला, शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहे. यावेळी अनिल कोतवाल, अतुल कोतवाल, मुकेश कोतवाल, रोहित कोतवाल, सचिन कोतवाल, जोजो कोतवाल आदी उपस्थित होते. 


शेतकऱ्यांनी बोगस खतांच्या बाबतीत तक्रार करताच स्थळपंचनामा करण्यात आला आहे. याबाबतचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आठ दिवसांत त्यांचा अहवाल अपेक्षित असून तोपर्यंत दुकानात  इफको कंपनीच्या ची एनपीके १२-३२-१६ खतांच्या एकूण १४८ खतांच्या गोण्या विक्रीस बंदी करण्यात आली आहे.-व्ही. एस. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी चांदवड.

संस्थेचे परवाना रद्द व्हावा

सदर खत हे बोगस असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतरही विक्रेत्याने 'काय करायचं करून घ्या' अशी अर्वाच्य भाषा वापरली. शेतकऱ्यांच्या जीवावर दुकाने चालविणाऱ्या या विक्रेत्याना बोगस खत विक्री करूनही भीती वाटत नाही. यांना कुणाचे पाठबळ आहे? शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई व्हावी.-भरत कोतवाल, पीडित शेतकरी चांदवड.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com