धक्कादायक! 'इथं' प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भागविली जातेय तंबाखू बहाद्दरांची तलफ!

उत्तम गोसावी : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. मात्र या लॉकडाउन काळातही काही व्यापाऱ्यांकडून ही संधी मानून गुटखा, गायछाप, बोंबली तंबाखू, विडी यांची छुप्या पद्धतीने अवाच्या सव्वा दराने ग्रामीण भागात सर्रास विक्री केली जात आहे.

नाशिक : (ओझर) लॉकडाउन काळातही तंबाखू अन् गुटखा खाणाऱ्या बहाद्दरांची चांगलीच गोची झाली आहे. कोरोनामुळे त्यांना तंबाखूची पुडीच मिळेनाशी झाली असून तलफ भागवायची तरी कशी? असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. त्यातूनच त्यांचा जीव अक्षरश: येडापिसा झाला आहे. काही व्यापाऱ्यांकडून ही संधी मानून असा धक्कादायक प्रकार केला जात आहे.

स्वतंत्र वितरण प्रणाली सुरू

लॉकडाउनच्या काळात ओझर गुटखामाफियांसह काहींनी आपली स्वतंत्र वितरण प्रणाली सुरू केली असून, यात घरपोच वस्तू दिली जात आहे. ओझर येथील गुटखामाफिया संपूर्ण जिल्ह्यातील अवैध गुटखा व्यवसायाचा जनक आहे. लॉकडाउनदरम्यान प्रशासनाकडून पानटपऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुटखा, तंबाखू, सिगारेट, पान, विडी यांचे सेवन करणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र हीच संधी असल्याचे मानत काही व्यापाऱ्यांकडून या वस्तूंची चढ्या दराने विक्री केली जात आहे. यात 140 रुपयांचा गुटख्याचा पुडा तब्बल 500, गायछाप तंबाखू दहा रुपयांची पुडी 50 ला आणि अठरा रुपयांचा विडीचा पुडा 45 रुपये दराने विकला जात आहे.  छुप्या पद्धतीने अवाच्या सव्वा दराने ग्रामीण भागात सर्रास विक्री केली जात आहे. हे सर्वकाही सुरू असतानादेखील प्रशासनाकडून मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने या व्यापाऱ्यांना वस्तू विकण्याकरिता मोकळे रान मिळत आहे. 

हेही वाचा > रात्री ड्युटीवरून महिला घरी जाताना..वाटेत तिघांनी अडविले..अन् मग....

विक्रेत्यांची स्वतंत्र वितरण प्रणाली 

मुंबई-आग्रा महामार्गावरून मध्य प्रदेशातून येथे गुटख्याची साठवणूक केली जाते. तेथून गुटख्याचा माल ओझर, पिंपळगाव, नाशिक शहरात येतो. ओझर येथे गुटखा आल्यानंतर तो वेगवेगळ्या ठिकाणी गावाबाहेर कोणाच्या मळ्यात, तर कोणाच्या घरात, बंगल्यात साठवला जात असून, तेथून दुचाकी वाहनांतून शहरात आणला जात आहे. पानटपऱ्या बंद असल्या तरी पानटपरी चालकांच्या घरी गुटख्यांचे पुडे सहज पोचविले जातात. हा सर्व व्यवहार पहाटेपासून ते दुपारी बारापर्यंत उरकला जात आहे. ओझर शहरामध्ये दररोज आठ ते दहा लाख रुपयांचा गुटखा अवैधपणे विकला जात असल्याची चर्चा आहे. संबंधित विभागातील काहींचे या गुटखामाफियांसोबत आर्थिक हित असल्याने या व्यवसायाला आजतरी सोन्याचे दिवस आले आहेत.  

हेही वाचा > लॉकडाउनचा येवला बस आगाराला फटका; तब्बल 'इतक्या' कोटींचा तोटा!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sale of gutkha and tobacco is rampant in Ozar and is being ignored by the administration nashik marathi news