पत्नी अन् मुलगाही पॉझिटिव्ह...तरीही कोरोनाच्या रणभूमीवर लढतोय योध्दा!

sanjay bafna corona.jpg
sanjay bafna corona.jpg

नाशिक / म्हसरूळ : लॉकडाउननंतर नाशिक शहरात कोरोना विषाणूचा विळखा वाढतच गेला. त्याचदरम्यान आरोग्य यंत्रणेवरील ताणही त्या पटीत वाढला. त्यामुळे जनसेवेच्या माध्यमातून महामारीवर मात करण्याचे उद्दिष्ट त्यांनी उराशी बाळगले आहे. विशेष म्हणजे पत्नी व मुलगा पॉझिटिव्ह असतानाही हा ‘कोरोना योद्धा’ अद्यापही कोरोनाच्या रणभूमीवर मोठ्या धैर्याने आपले कर्तव्य पार पाडत आहे. 

पत्नी, मुलगा पॉझिटिव्ह असूनही कोरोनाबाधितांची सेवा 

पंचवटीतील डॉ. संजय बाफना १९८७ पासून आरोग्यसेवा बजावत आहेत. पत्नी व मुलगा असे त्यांचे छोटेखानी कुटुंब. सुरवातीपासूनच त्यांना जनसेवेची आवड असल्याने कोणत्याही सामाजिक उपक्रमात ते हिरिरीने सहभाग घेतात. सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. सुरवातीला रुग्णसंख्या कमी होती. परंतु त्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या अशी वाढली, की जणू आगडोंबच उसळला. मनात जनसेवेची तळमळ व शहरात वाढती रुग्णसंख्या बघता तुळजा भवानीनगर येथील आपले समर्थ क्लिनिक बंद ठेवून भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष नंदू साखला व दीपक चोपडा यांच्या माध्यमातून गेल्या ५ एप्रिलपासून ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमातून त्यांनी जनसेवा सुरू केली. ही सेवा सुरू केल्यापासूनच ते कुटुंबास त्रास होऊ नये म्हणून स्वतंत्र राहत होते. 

कोरोना योद्ध्यांचा संघर्ष

नाशिक शहरात हॉटस्पॉट ठरलेल्या वडाळागाव, पंचवटीतील पेठ रोड, फुलेनगर भागात त्यांचे काम सुरू होते. दरम्यानच्या काळात मुलगा मित्राच्या वाढदिवसाला गेला असता तोही कोरोना पॉझिटिव्ह आला व त्याच्या संपर्कात आलेल्या त्यांची पत्नीदेखील पॉझिटिव्ह आढळून आल्या. तरीदेखील खचून न जाता मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व पत्नीवर घरीच उपचार करतानाच, डॉ. संजय बाफना यांनी त्यांची जनसेवा कायम ठेवली. सगळ्या महामारीत आतापयर्यंत त्यांनी साडेचार हजार कोरोना संशयित रुग्ण तपासले. त्यातील तीनशेहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आढळले. पत्नी व मुलगा पॉझिटिव्ह निघाल्यानंतरही अविरत जनसेवा सुरू ठेवणाऱ्या या कोरोना योद्ध्यांचा संघर्ष म्हणूनच वेगळा आहे. 

जनसेवेचा वसा यापुढेही अविरत

मित्राच्या वाढदिवसाला गेलेला मुलगा कोरोनाबाधित झाला. श्‍वसनास त्रास होऊ लागल्याने त्याला ‘आयसीयू’त दाखल केले होते. पत्नीही मुलाच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह आली. मात्र तिच्यावर घरीच उपचार सुरू होते. जनतेच्या आशीर्वादामुळे सुदैवाने दोघेही कालच सुखरूप घरी परतले. हाती घेतलेला जनसेवेचा वसा यापुढेही अविरत सुरू ठेवणार आहे. - डॉ. संजय बाफना, कोरोना योद्धा, पंचवटी, नाशिक 

माझे पती डॉ. संजय बाफना यांना जनसेवेची आवड आहे. ‘मिशन झीरो नाशिक’मध्ये कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. यादरम्यान मी व माझा मुलगा समर्थ कोरोनाबाधित आढळलो असलो तरीदेखील त्यांनी न डगमगता सेवा सुरू ठेवली. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्यांच्याकडून अशीच जनसेवा नेहमी घडो आणि नाशिक शहरच नव्हे, तर अवघे जगच या महामारीतून मुक्त होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. - नीता बाफना, (डॉ. संजय बाफना यांच्या पत्नी) 
 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com