सायखेड्यात शेख पती-पत्नी बनले गावकारभारी! आई-वडिलांच्या विजयाची पुनरावृत्ती

उत्तम गोसावी
Friday, 22 January 2021

निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी गावाच्या विकासासाठी मारुती मंदिरात एकविचाराने एकत्र येऊन जुन्या-नव्या सर्वपक्षीय जाणत्या नेत्यांच्या विचाराने विकासाच्या मुद्द्यावर निवड करावी, निवडणुकीत मतदार व नागरिकांना विकासाचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी भविष्यात क्रियाशील राहावे, असे शेख म्हणाले. 

ओझर (नाशिक) : जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातून ‘श्री’ आणि ‘सौ’ यांनी आपले नशीब आजमावले. त्यात गोदाकाठावरील राजकीयदृष्ट्या अतिशय अटीतटीच्या निवडणूक संघर्षात सायखेडा ग्रामपंचायतीत वॉर्ड क्रमांक दोनमधून समिनाबानो शेख आणि वॉर्ड एकमधून अश्पाक शेख या पती-पत्नीने आपले नशीब आजमावले आणि २००१ मध्ये निवडून आलेल्या वडील इब्राहिम शेख आणि आई जानबी शेख यांच्या विजयाची पुनरावृत्ती घडवत दोघेही गावकारभारी बनले. 

आई-वडिलांच्या विजयाची पुनरावृत्ती करीत खेचला विजय 

अश्पाक शेख यांचे वडील इब्राहिम शेख सायखेडा ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून सरपंच, उपसरपंच, तर कधी सदस्य राहिले आहेत. अश्पाक शेख गाव आणि परिसरात अनेक सामाजिक कामे करतात. गोरगरीब आणि कष्टकऱ्यांच्या हाकेला तत्पर धावून जात असल्यानेच वॉर्ड दोनमधून ४२८ मते मिळवून, तर पत्नी समिनाबानो वॉर्ड एकमधून ३९६ मते मिळवून विजयी झाल्या. शेख यांची निवडून येण्याची ही पाचवी टर्म आहे. पुढील राजकीय वाटचालीत सरपंचपदासाठी इच्छुक आहात का, असे विचारले असता ते म्हणाले, की औटघटकेचा सरपंच होण्यात मला रस नाही; परंतु निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी गावाच्या विकासासाठी मारुती मंदिरात एकविचाराने एकत्र येऊन जुन्या-नव्या सर्वपक्षीय जाणत्या नेत्यांच्या विचाराने विकासाच्या मुद्द्यावर निवड करावी, निवडणुकीत मतदार व नागरिकांना विकासाचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी भविष्यात क्रियाशील राहावे, असे शेख म्हणाले. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

गावात काम करताना पक्ष, गटतट विसरून सर्वसामान्य व कष्टकऱ्यांच्या हाकेला तत्पर धावून जाणे व त्यांचे दुःख, अडचणी सोडविणे महत्त्वाचे असते. कष्टकऱ्यांच्या हाकेला धावून जात असल्यानेच आमचा पती-पत्नीचा विजय झाला. - अश्पाक शेख, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सायखेडा

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Saykheda, Sheikh and his wife became village stewards nashik marathi news