शाळेत पाऊल ठेवताच मुलांचे फुलले चेहरे! पाचवी ते आठवीच्‍या वर्गांना संमिश्र प्रतिसाद 

अरुण मलाणी
Wednesday, 27 January 2021

अनलॉक प्रक्रियेत यापूर्वी नववीपुढील शाळांना सुरवात झालेली असताना, दुसऱ्या टप्प्‍यात बुधवार (ता. २७)पासून पाचवी ते आठवीच्‍या वर्गांना सुरवात झाली. अनेक दिवसांपासून ऑलनाइन अध्ययनापासून कंटाळलेल्‍या विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. प्रांगणात पाऊल ठेवताच त्यांच्यात उत्‍साह संचारला होता

नाशिक : अनलॉक प्रक्रियेत यापूर्वी नववीपुढील शाळांना सुरवात झालेली असताना, दुसऱ्या टप्प्‍यात बुधवार (ता. २७)पासून पाचवी ते आठवीच्‍या वर्गांना सुरवात झाली. अनेक दिवसांपासून ऑलनाइन अध्ययनापासून कंटाळलेल्‍या विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. प्रांगणात पाऊल ठेवताच त्यांच्यात उत्‍साह संचारला होता. आपल्‍या मित्र-मैत्रिणींची भेट झाल्‍याने चेहरे फुलले होते. पहिलाच दिवस असल्‍याने काही विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी त्‍यांचे पालकही आले होते. शाळांनीही विद्यार्थ्यांचे स्‍वागत करताना सुरक्षिततेच्‍या उपाययोजना योजल्या. 

पाचवी ते आठवीच्‍या वर्गांना उत्‍साहात सुरवात

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, परिस्‍थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्‍यातच शाळा सुरू करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे. पहिल्‍या टप्प्‍यात नववी-दहावीचे वर्ग सुरू झाले. प्रजासत्ताक दिनानंतर बुधवार (ता.२७)पासून पाचवी ते आठवीच्‍या वर्गांना उत्‍साहात सुरवात झाली. काही शाळांनी सकाळच्‍या सत्रात, तर काहींनी दुपारच्‍या सत्रात विद्यार्थ्यांची व्‍यवस्‍था केली. शाळेच्‍या प्रवेशद्वारावर उपस्‍थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्‍या चेहऱ्यावर मास्‍क असल्‍याची खात्री करताना, थर्मल स्‍कॅनिंग व सॅनिटायझरने हात स्‍वच्‍छ करत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. 

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

उपस्‍थितीचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक

मर्यादित तासांसाठी शाळा भरल्‍या तरीदेखील आपल्‍या मित्र-मैत्रिणींना भेटल्‍याचा आनंद विद्यार्थ्यांच्‍या चेहऱ्यावर झळकत होता. एका बाकावर एकच विद्यार्थी बसविण्याची व्‍यवस्‍था शाळांनी केली होती. शहरी भागाच्‍या तुलनेत शालेय उपस्‍थितीचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक राहिले. पहिलाच दिवस असल्‍याने शहरी भागात शाळांना फारशी गर्दी जाणवली नाही. या उलट ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. एकूणच शाळा सुरू होण्याच्‍या पहिल्‍या दिवशी जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद राहिला.  

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools have been started in Nashik Marathi news