आत्मनिर्भर गाव! अंबासनची विकासगंगा सुसाट; विविध योजना राबवून गावाचे बदलले रूपडे

दिपक खैरनार | Friday, 4 September 2020

गावाचे ग्रामदैवत डोंगरावर खंडेराव महाराजांचे भव्य मंदिर उभारले आहे. १४ व्या वित्त आयोग योजनेंतर्गत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटारींचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, तसेच चौकाचौकात सभामंडप उभारण्यात आले आहेत.

नाशिक : (अंबासन) 'गाव करील ते राव काय करील' या जुन्या उक्तीप्रमाणे गावाची विकासगंगा जोमाने सुरू आहे. शासनाच्या विविध योजना राबवून गाव आत्मनिर्भरतेच्या वाटेवर वाटचाल करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबवून आजतागायत गाव कोरोनामुक्त करण्यात यशस्वीपणे पार पाडले आहे. 

गावाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी तरुणांचा पुढाकार

अंबासन हे गाव डोंगराच्या पायथ्याशी व मोसम नदीकिनारी वसलेले आहे. यामुळे गावाला चोहोबाजूंनी निसर्गसौंदर्य लाभले आहे. गावाची लोकसंख्या सात हजारांच्या घरात असून, ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. १९५२ मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. बाजारपेठेत मुख्य चौकाचौकात व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी केंद्रीय नभोवाणीमंत्री असताना गावाला भेट दिली होती. त्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे उद्‍घाटन करण्यात आले होते. पहिले सरपंच म्हणून रतन हरी भामरे यांनी पद भूषविले तेव्हापासून विकासाच्या पाऊलखुणा उमटवत आहेत. हाच हातखंडा घेऊन तरुण गावाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी एकवटले आहेत. 

नागरिकांना मार्गदर्शन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीमार्फत निर्जंतुकीकरण करण्यासाठी वेळोवेळी फवारणी केली जात आहे. कोरोना विषाणूबाबत शासनस्तरावरून प्राप्त सूचना नागरिकांना ग्रामपंचायतीच्या लाउडस्पीकरवरून दिल्या जात आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी सॅनिटायझर कक्ष उभारण्यात आले होते, तसेच गावातील स्वयंसेवकांसह चार आशा स्वयंसेविका घरोघरी नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन केल्याने कोरोनामुक्त ठेवण्यात यशस्वी झाले. 

शासकीय निधीचा योग्य विनियोग 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण गाव हागणदारीमुक्त केले, तसेच सातत्य टिकविण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून सार्वजनिक महिला व पुरुष शौचालयाची कामे प्रस्तावित आहेत. यापूर्वी जायखेडा पोलिस ठाण्यांतर्गत गावातील तंटामुक्त समितीने अतिशय उल्लेखनीय कामगिरी करीत तंटामुक्त आदर्श गाव म्हणून सन्मानित करण्यात आले होते व सात लाखांचे बक्षीसपात्र झाले होते. गावाचे ग्रामदैवत डोंगरावर खंडेराव महाराजांचे भव्य मंदिर उभारले आहे. १४ व्या वित्त आयोग योजनेंतर्गत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटारींचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे, तसेच चौकाचौकात सभामंडप उभारण्यात आले आहेत. गावात ३६ दिव्यांगांना शासनाच्या आदेशानुसार ५ टक्के सेसमधून आर्थिक सहाय्य दिले जात आहे. 

भविष्यातील कामे 

गावात भविष्यात खंडेराव महाराज मंदिराच्या डोंगरावर सुशोभीकरण, पावसाळ्यात डोंगराचे पाणी गल्लीबोळातून वाहून जात असल्याने गावाबाहेर विल्हेवाट लावून शेतीसाठी उपयुक्त करणे, जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीसाठी दहन ओठ्यांचे काम, गावठाण विहिरीची आरसीसी रिंगाची कामे करून उंची वाढविणे, गावांतर्गत गल्ली/रस्ते काँक्रिटीकरण करणे, आदिवासी वसाहतीत सभामंडपाला संरक्षण जाळी बसविणे आदी कामे केली जाणार आहेत. याकरिता माजी सरपंच रोहिणी कोर, रवींद्र कोर, दिलीप भामरे, सुनीता आहिरे, जितेंद्र आहिरे व सदस्यांचे योगदान मिळत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

योग्य नियोजन व ग्रामस्थांनी दिलेली ग्रामपंचायत प्रशासनाला साथ यामुळे आजतागायत कोरोनामुक्त ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. - व्ही. व्ही. सावंत, प्रशासक अंबासन 

विविध शासकीय योजना राबवून विकासाला गवसणी घातली जात आहे. तालुक्यातील पाणीदार गाव म्हणून अंबासनची ओळख आहे. - एम. आर. वाघ, ग्रामविकास अधिकारी, अंबासन 

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

संपादन - किशोरी वाघ