'महापालिका आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'; नगरसेवकाच्या मागणीने मालेगावात खळबळ

प्रमोद सावंत
Friday, 2 October 2020

सहारा हॉस्पीटलमधून एक व्हेन्टीलेटर 25 ऑगस्टला लोटस रुग्णालयात पाठविले. हे व्हेन्टीलेटर 17 सप्टेंबरला परत आले. तत्पुर्वी 23 ऑगस्टला आयुक्तांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यांना त्रास वाढल्यानंतर लोटसला दाखल करण्यात आले. तेथे व्हेन्टीलेटर असताना खबरदारी म्हणून सहारा रुग्णालयातील व्हेन्टीलेटर मागविण्यात आले.

नाशिक/मालेगाव : महापालिका आयुक्त ञ्यंबक कासार यांनी मनपाने कोविड रुग्णांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या सहारा रुग्णालयातील व्हेन्टीलेटर रुग्णांना आवश्‍यक असताना लोटस खासगी हॉस्पीटलमध्ये पत्नीला दाखल केल्याने बॅकअपसाठी मागवून अधिकाराचा गैरवापर केला. सहारातील व्हेन्टीलेटर अन्यत्र हलविल्याने तिघांचा मृत्यू झाला. ही बाब गंभीर असून या प्रकरणी आयुक्तांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार नगरसेवक तथा जनता दलाचे सरचिटणीस मुश्‍तकीम डिग्निटी यांनी अपर पोलिस अधिक्षकांकडे केली.

मनपा आयुक्तांविरुध्द तक्रार अर्ज आला असून त्याबाबत चौकशीनंतर तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल होईल असे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी ‘सकाळ’ला सांगितले. मुश्‍तकीम डिग्निटी व सहकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.2) दुपारी महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सहारा हॉस्पीटलमधून एक व्हेन्टीलेटर 25 ऑगस्टला लोटस रुग्णालयात पाठविले. हे व्हेन्टीलेटर 17 सप्टेंबरला परत आले. तत्पुर्वी 23 ऑगस्टला आयुक्तांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्या. त्यांना त्रास वाढल्यानंतर लोटसला दाखल करण्यात आले. तेथे व्हेन्टीलेटर असताना खबरदारी म्हणून सहारा रुग्णालयातील व्हेन्टीलेटर मागविण्यात आले. याच दरम्यान व्हेन्टीलेटर अभावी सहारामधील तिघांचा मृत्यू झाला. या मृत्यूस आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप मुश्‍तकीम डिग्निटी यांनी केला. त्यांनी तक्रार अर्जासोबत लोटसला व्हेन्टीलेटर देण्यासंदर्भात आयुक्तांनी कार्यवाही करण्याची सूचना दिलेले लोटसचे पत्र जोडले आहे. 

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

आयुक्तांविरुध्द एकवटले सर्वपक्षीय नगरसेवक 

महापौर ताहेरा शेख, माजी महापौर रशीद शेख यांनी दोन दिवसापुर्वी पत्रकार परिषदेत आयुक्तांनी स्थायी समिती सभापतींशी संगनमत करुन कचरा संकलन ठेकेदार वॉटरग्रेसला बेकायदेशीररित्या दहा वर्षे मुदतवाढ दिल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी आयुक्तांविरुध्द विरोधकांनी सहकार्य केल्यास अविश्‍वास ठराव आणण्याचे सुतोवाच केले होते. आठवड्यापुर्वी भाजप गटनेते सुनील गायकवाड यांनीही आयुक्त खासगी रुग्णालयाकडून होणाऱ्या बील लुटीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला होता. पाठोपाठ महागटबंधनचे नगरसेवक मुश्‍तकीम डिग्निटी यांनी हा आरोप केल्याने आयुक्तांच्या कामकाजाबद्दल नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचे जाणवते.
 

 

शहरात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. आपल्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी रात्रभर जागून सहारा कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले. मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची सर्वाधिक काळजी घेतली जात असल्यानेच बाहेरील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अशा स्थितीत व्हेन्टीलेटर शिल्लक असल्याने माणुसकी व सहकार्याच्या भावनेतून आपण लोटसला एक व्हेन्टीलेटर दिले. त्याचवेळी लोटसला व्हेन्टीलेटर उपलब्ध हाेताच परत करण्याची सूचनाही केली. माझ्यासह पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह आली. याही स्थितीत आपण न डगमगता जोमाने कामकाज केले. पत्नी फक्त सलाईन घेण्यासाठी लोटस हॉस्पीटलला गेली होती. त्यामुळे या आरोपात कुठलेही तथ्य नाही. - ञ्यंबक कासार, आयुक्त, मालेगाव महानगरपालिका 

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serious allegations of corporator against Municipal Commissioner malegaoan nashik marathi news