पत्नीने पतीच्या अंगावर रॉकेल ओतले..मेहुणीने धरले अन् प्रियकराने काडी पेटवली

wife murder husband.jpg
wife murder husband.jpg

नाशिक / मालेगाव : बहीण व तिच्या प्रियकराच्या मदतीने मेहुण्याचा खून केल्याच्या आरोपावरून चांभारडी (ता. चाळीसगाव जि. जळगाव) येथील बशाबाई ऊर्फ उषाबाई इंदल सोनवणे (45) हिला येथील न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावास, अशी शिक्षा सुनावली. जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश आर. एच. मोहंमद यांनी मंगळवारी (ता. 25) हा निकाल दिला. दरम्यान, या खटल्यातील अन्य दोघा आरोपींना न्यायालयाने यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, ते शिक्षा भोगत आहेत. 

असा घडला धक्कादायक प्रकार...

या खटल्याची पार्श्‍वभूमी अशी की नांदगाव रेल्वेलाइनजवळ राहणाऱ्या मच्छिंद्र गंगाधर सोनवणे व त्याची पत्नी नंदाबाई यांच्यात वाद होते. 24 ऑक्‍टोबर 2009 ला मच्छिंद्र नंदाबाईकडे असलेल्या लहान मुलीस भेटण्यास गेला होता. त्या वेळी तिने त्याला मुलीस भेटू दिले नाही. दोघांचे भांडण झाले. मच्छिंद्र नाशिकला परत जात असताना नंदाबाई, तिचा प्रियकर बाळू मोरे व तिची बहीण बशाबाई या तिघांनी त्याला गाठले. नंदाबाईने पती मच्छिंद्र याच्या अंगावर रॉकेल टाकले. बशाबाईने त्याला धरून ठेवले. बाळूने काडी लावून पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या मच्छिंद्रचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

नांदगाव पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी नंदाबाई व बाळूला अटक केली. बशाबाई मात्र फरारी होती. दोघांविरुद्ध न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. दरम्यानच्या काळात बशाबाईला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. ऍड. अशोक पगारे यांनी सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com