श्रावणमासी हर्ष घालवी.. कोरोनाचे साम्राज्य चोहीकडे! निसर्गाने बहरलेल्या त्र्यंबकनगरीच्या परिस्थितीचा आढावा

bramhagiri 123.jpg
bramhagiri 123.jpg

नाशिक / त्र्यंबकेश्‍वर : ब्रह्मगिरी पर्वत व श्रावणाचे अतूट नाते आहे. ज्येष्ठ व आषाढ या भागातील पाऊस पडणारे हे मुख्य महिने या दोन महिन्यांत‌ मेघराज ब्रह्मगिरीवर धुवाँधार वृष्टी करीत या परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकतो. निसर्गाची कृपादृष्टी लाभलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात श्रावणात सर्वत्र पर्वतातून वहात असलेले छोटे-मोठे धबधबे व चहूकडे हिरवा शालू असलेला हा नटलेला परिसर सर्वांचे आकर्षण निश्चितच ठरतो. अशा निसर्गाने बहरलेल्या श्रावणात सोमवारची नगर प्रदक्षिणेची श्रावणफेरी म्हणजे निसर्गाशी तादात्म पावण्याची पर्वणी... पण यंदा या सगळ्याला कोरोना महामारीची दृष्ट लागल्याने ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ आपण म्हणूच शकत नाही. 

श्रावणमासी हर्ष घालवी, कोरोनाचे साम्राज्य चोहीकडे 

लॉकडाउनमुळे परिसरातील धबधब्यांवर फिरायला बंदी आहे. पर्यटकांची गर्दी वाढून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने लोकांना जमायला परवानगी नाही. निसर्गाने आपले काम केले आहे. नेहमी इतका नसला तरीही टप्प्याने पाऊस पडल्याने सर्वत्र हिरवे वातावरण व धबधबे वहात आहेत. मात्र हा सगळा निसर्ग नजरेत साठवणाऱ्यांची मात्र यंदा कमतरता आहे. निसर्गाशी तादात्म पावण्यासाठीची ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा म्हणजेच श्रावणफेरीला यंदा कोरोना महामारीच्या संकटाचे ग्रहण आहे. यामुळे श्रावणात ही प्रदक्षिणा थांबणार आहे. दर वर्षी श्रावणातील तिसऱ्या प्रदक्षिणेस लाखोंची हजेरी या वर्षी मात्र थांबणार आहे. ‘बम बम भोले...’ ‘हर हर महादेवचा गजर’ही यंदा राहणार नाही. खास श्रावणात व्रत व वैकल्यासाठी दूरदूरून येणाऱ्या भाविकांना बंदी असल्याने त्यांच्या दर वर्षीच्या अनुष्ठानात यंदा व्यत्यय येणार आहे. 

श्रावणफेरी बंद 
ब्रह्मगिरी प्रदक्षिणा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. माणसाच्या शारीरिक क्षमतेचा यात कस लागतो. निसर्गाच्या सान्निध्यात फिरुरून मनाची उभारी वाढून मन प्रसन्न करणारी बाब म्हणूनही प्रदक्षिणेची महती आहे. यात वीस व चाळीस किलोमीटरच्या दोन प्रदक्षिणेचा अंतर्भाव येतो. त्यांना छोटी व मोठी प्रदक्षिणा संबोधतात. या मार्गात ठिकठिकाणी तीर्थांचा परिसर आहे. श्रावणात महिनाभर, तर काही सोमवार अथवा महत्त्वाच्या तिथीला प्रदक्षिणेस जातात. चहूबाजूला असलेल्या निसर्गाचा सात- आठ तासांचा सहवास अनुभवतात. या वर्षी निसर्ग फुलला आहे. परंतु महामारीने निसर्ग सहवासासही मोठा अडथळा उभा केला आहे. हा सगळा अनुभवास मुकण्याची वेळ आल्याने निसर्गप्रेमींची अवस्था बिकट झाली आहे. श्रावणातील त्र्यंबकेश्‍वरकडे धार्मिकदृष्ट्या बघणाऱ्यांनी या दृष्टीने पाहिल्यास, ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा काही भाविकांचा दर वर्षीचा जाण्याचा नियम आहे, तर काही स्थानिक भाविक नित्यनेमाने प्रदक्षिणा करणारे आहेत. परंतु हे सर्व चक्र सध्या थांबले आहे. 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com