मका हमीभावाच्या लाभापासून सहा हजार शेतकरी वंचित; दहा ते बारा हजार शेतकऱ्यांना देखील फटका

CORN.jpg
CORN.jpg

येवला (जि.नाशिक) : खासगी बाजारभावाच्या तुलनेत क्विटलमागे ५०० ते ६०० रुपये जास्त बाजारभाव असल्याने जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेंतर्गत मका विक्रीसाठी शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, हमीभावाची खरेदी म्हणजे ‘गजर गाड्याचा...’ प्रकार असल्याने तब्बल नऊ हजार २४८ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नावनोंदणी करूनही फक्त तीन हजार ५१४ शेतकऱ्यांची मका खरेदी होऊ शकली आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार ७३४ शेतकऱ्यांना हमीभावाच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. अर्थात हे फक्त ऑनलाइन नोंद केलेली शेतकरीसंख्या असून, या व्यतिरिक्तही दहा ते बारा हजार शेतकऱ्यांना देखील हा फटका बसला आहे. 

हमीभावाची खरेदी म्हणजे ‘गजर गाड्याचा...’
जिल्ह्यात शासकीय आधारभूत मका खरेदीला २ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नावनोंदणी सुरू झाली, तर जिल्ह्यात साधारणतः १८ नोव्हेंबरपासून मका खरेदी सुरू झाली अन्‌ ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत असताना १६ डिसेंबरला राज्यासाठीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ऑनलाइन पोर्टल बंद होऊन मका खरेदी बंद पडली होती. राज्याचे चार लाख ४९ हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट १६ तारखेपर्यंतच पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील ऑनलाइन नोंदणी केलेल्या नऊ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ एक हजार ८२३ शेतकऱ्यांची मका खरेदी होऊ शकली. अचानक खरेदी बंद झाल्याने विक्रीच्या प्रतीक्षेतील सात हजार ४१९ शेतकऱ्यांचा संताप यामुळे वाढला होता. किंबहुना शासनाचा हमीभाव १,८५० रुपये असताना क्विंटलमागे ४०० ते ६०० रुपयांची झळ करून शेतकऱ्यांनी खासगी बाजारात १,२०० ते १,४०० रुपये दराने मका विक्री केल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला आहे.

त्यातच केंद्र व राज्य शासनाच्या गोंधळात तब्बल २५ दिवस बंद असलेली शासकीय आधारभूत मका खरेदी १६ जानेवारीनंतर मुदतवाढ मिळाल्याने सुरू झाली होती. ३१ तारखेपर्यंत वाढीव दीड लाख क्विंटल खरेदीचा निर्णय झाला होता. आता उद्दिष्टपूर्ती झाली असून, मुदतही संपल्याने व वाढीव मुदतवाढ मिळणार नसल्याने नाईलाजाने शेतकरी खासगी बाजारात मिळेल त्या दराने मका विक्री करत आहेत. अद्यापही निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांकडे मका शिल्लक आहे. त्यातच बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री उद्योग संकटात आल्याने मक्याची मागणी घटली असून, साहजिकच बाजारभावावरही परिणाम झाला आहे.

मका खरेदी बंद, जिल्ह्यातील अवघ्या साडेतीन हजार शेतकऱ्यांचीच खरेदी 

सध्या बाजार समित्यांमध्ये मक्याला १,१०० ते १,४५०, तर सरासरी १,३५० रुपयांचा दर मिळत आहे. म्हणजेच हमीभावाच्या तुलनेत ५०० ते ५५० रुपये तोटा सहन करून शेतकरी व्यापाऱ्यांना मका विक्री करीत आहे. वास्तविक, जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची जरी हमीभावाने मका खरेदी झाली असती तरी कोट्यवधींचा फायदा शेतकऱ्यांचा झाला असता. मात्र, नावनोंदणी करूनही सहा हजार शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळालेला नसल्याने आधारभूत किंमत योजना फसवी आणि दिखाऊ असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

...असे राहिले शेतकरी वंचित 
खरेदी केंद्र - ऑनलाइन नोंदणी - खरेदी शेतकरीसंख्या - खरेदी क्विंटल 
सिन्नर - १,१६४ - ५०१ - १५,१२६ 
येवला - १,४१२ - ५१८ - २९,९९० 
लासलगाव - १,०८३ - ५५८ - १७,७६७ 
चांदवड - १,०७६ - ४२१ - १४,७४० 
मालेगाव - १,२५१ - ५०१ - १९,८०३ 
सटाणा - ८०९ - २७९ - १०,४०९ 
नामपूर - ४०५ - १४८ - ५,२०३ 
देवळा - १,१३१ - ३३८ - १३,७२९ 
नांदगाव - ९१७ - २५० - १०,१५१ 
एकूण - ९,२४८ - ३,५१४ - १,३६,९२१ 

शासनाच्या सूचनांनुसार भरड धान्य खरेदी ३१ तारखेला संपली आहे. जिल्ह्यात मक्याची एक लाख ३६ हजार ९२१ क्विंटल खरेदी झाली असून, सर्वाधिक खरेदी येवल्यात झाली आहे. तीन हजार ५१४ शेतकऱ्यांची एकूण खरेदी झाली असून, दोन हजार ५९ शेतकऱ्यांना १४ कोटी ८८ लाखांचे पेमेंट अदा केले आहे. -विवेक इंगळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, नाशिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com