देवपूरपाड्याच्या माहेरवाशिणीची उंच झेप.. जबाबदाऱ्या सांभाळून केले स्पप्न पूर्ण

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा 
Friday, 20 March 2020

शिक्षण होते; पण मार्गदर्शन नसल्याने लग्नानंतर पतींनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग दाखवला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. मात्र खचून गेले नाही. त्यानंतर संसारात अनेक अडचणींना सामोरे जात प्रयत्न सुरू ठेवले. माझ्या लहान सहा वर्षांच्या मुलीला सांभाळून वेळ मिळेल तेव्हा अभ्यास सुरूच ठेवला आणि स्वप्नपूर्ती झाली. या यशात पती, सासू-सासरे व आई-वडील भाऊ यांचे मोलाचे योगदान आहे.

नाशिक / दहीवड : घर प्रपंच आणि कुटुंबाचा कणा होत सोनाली आहेर यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाला दुसऱ्या प्रयत्नात गवसणी घातली. सोनाली यांनी 2018 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात इतर मागास प्रवर्गात (महिला) 22 वी रॅंक मिळवली. 

शिक्षक भरती न झाल्याने तिथे निराशाच पदरी..तरीही...

देवपूरपाडे (ता. देवळा) येथील दिलीप उत्तम आहेर यांची कन्या सोनालीचे प्राथमिक शिक्षण देवपूरपाडे येथे झाले. माध्यमिक शिक्षण ज्ञानेश्‍वर माउली माध्यमिक विद्यालय, देवपूरपाडे येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण मेशी येथे केले. त्यांनतर येसगाव (ता. मालेगाव) येथील साने गुरुजी अध्यपाक विद्यालयात डी. एड. पूर्ण केले. शिक्षिका होण्याचे स्वप्न मनात बाळगले असले तरी शिक्षक भरती न झाल्याने तिथे निराशाच पदरी आली. त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली. 2013 मध्ये नांदगाव तालुक्‍यातील वाखारी येथील मेघराज काकळीज यांचे पुत्र ज्ञानेश्‍वर यांच्याशी विवाह झाला. पती पोलिस असल्यामुळे खाकीबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर होता. पतीकडून मिळणारे मार्गदर्शन व प्रेरणा घेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्यांनी सुरू ठेवला. घरची कामे आणि अभ्यास या दुहेरी कामांमुळे पहिल्या प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु अभ्यासातील सातत्य व परिश्रम करण्याची जिद्द याच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. 

अभ्यास सुरूच ठेवला आणि स्वप्नपूर्ती झाली
शिक्षण होते; पण मार्गदर्शन नसल्याने लग्नानंतर पतींनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग दाखवला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात यश आले नाही. मात्र खचून गेले नाही. त्यानंतर संसारात अनेक अडचणींना सामोरे जात प्रयत्न सुरू ठेवले. माझ्या लहान सहा वर्षांच्या मुलीला सांभाळून वेळ मिळेल तेव्हा अभ्यास सुरूच ठेवला आणि स्वप्नपूर्ती झाली. या यशात पती, सासू-सासरे व आई-वडील भाऊ यांचे मोलाचे योगदान आहे. - सोनाली आहेर 

हेही वाचा > धक्कादायक! आंघोळीसाठी 'तीघी' तलावात उतरल्या...अन् थोड्या वेळाने मृतदेहच पडले बाहेर..

कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून यशाला आपलेसे केले
सोनालीने तिच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केले आहे. कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून तिने यशाला आपलेसे केले. तिच्या या यशाबद्दल मला व माझ्या कुटुंबीयांना तिचा अभिमान आहे. - ज्ञानेश्‍वर काकळीज, सोनालीचे पती 

हेही वाचा > दहावीतला मुलगा पेपरच्या आदल्या दिवशीच मित्रासह पळाला....रेल्वे स्टेशनहून दोघांची खबर आली की..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonali aher becomes PSI Nashik marathi news