शहर बससेवा करारनंतर प्रदूषणाचा साक्षात्कार; स्थायी समितीचा विरोध शहर विकासाच्या मुळावर 

nashik bus service
nashik bus service

नाशिक : महापालिकेच्या वतीने सुरू होणारी बससेवा दृष्टिपथात असताना स्थायी समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांना बस ऑपरेटरकडून चालविल्या जाणाऱ्या बस जुन्या तंत्रज्ञानाच्या असल्याचा व यामुळे शहरात प्रदूषण वाढेल, असा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या परवानगीशिवाय बस सुरू करू नका, असे आदेशित करण्यात आल्याने स्थायी समितीचा हा विरोध शहर विकासाच्या मुळावर उठत असल्याची भावना नाशिककरांमध्ये तयार झाली आहे. 

नाशिक शहर वेगाने विकसित होत असल्याचे दावे केले जात आहे. असे असले तरी पायाभूत सुविधांपैकी एक असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा येथे बोऱ्या वाजला आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून बससेवा टप्प्याटप्प्याने बंद केली जात आहे. बससेवा नसल्याने खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. खासगी वाहने वाढल्याने हवा, ध्वनिप्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. नाशिकमध्ये दरमानसी उत्पन्न कमी असल्याने मध्यमवर्गीयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रत्येकालाच वाहने खरेदी करणे परवडणारे नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहतूकव्यवस्था हाच पर्याय आहे. एकमेव बस हाच पर्याय शहरात आहे. लोकल सेवा, मेट्रो या सेवा सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे एसटीने सेवा नाकारल्यानंतर महापालिकेने बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अडीचशे बस सुरू केल्या जाणार आहेत. ऑपरेटर नियुक्त करण्यापासून डेपो तयार करणे, वाहक नियुक्त करणे या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आता बससेवा कधी सुरू होतेय, याची वाट नाशिककर पाहत असताना स्थायी समितीमध्ये सदस्यांनी खोडा घातला आहे. त्यानुसार सभापती गणेश गिते यांनी स्थायी समितीला विचारात घेतल्याशिवाय बससेवा सुरू न करण्याच्या सूचना दिल्याने शहर विकासाला मोठा अडसर निर्माण झाला आहे. 


नेमका विरोध कशासाठी? 

केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने भारत स्टेज चार (बीएस चर) या जुन्या प्रदूषणकारी इंजिनची वाहने ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी प्रदूषण करणारी भारत स्टेज सहा (बीएस सहा) या प्रकारची वाहनांना आरटीओकडून परवानगी दिली जात आहे. नाशिक शहरात ज्या बस चालविल्या जाणार आहे त्या बस बीएस चार प्रकारची आहेत. लॉकडाउनच्या काळात या बस आरटीओकडून पासिंग करून घेण्यात आल्या. त्या वेळी मीडियाने वारंवार ही बाब समोर आणूनही सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी दखल घेतली नाही. आता बससेवा येत्या काही दिवसांत सुरू होणार असताना बीएस-चार बस रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर यांच्यासह स्थायीच्या अन्य सदस्यांनी घेतला व त्याला ‘मम’ म्हणत सभापतींनीदेखील सेवा सुरू न करण्याचे आदेश दिल्याने कर व दर ठरविणाऱ्या स्थायी समितीकडून शहर विकासात अडथळा निर्माण केला जात असल्याचे बोलले जात आहे. बससेवेचा करार करताना बीएस-६ प्रकारच्या बसची अट त्या वेळी का टाकण्यात आली नाही. नेमके आताच विरोधाचे कारण काय, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. 

शहर बससेवा शहरासाठी गरजेची आहे. शहरातील ग्रामीण भागातून शिक्षण, नोकरीसाठी अनेकजण येतात. खासगी वाहने परवडणार नसल्याने बससेवा हाच एक आधार आहे. त्यामुळे लवकरात लवकर सेवा सुरू व्हावी. 
-भूषण काळे, विद्यार्थी प्रतिनिधी 

सातपूर परिसरातील विद्यार्थ्यांना बस सेवेअभावी एबीबी सर्कलपासून कॉलेज रोडपर्यंत पायपीट करावी लागते. कारखान्यांमधील कामगारांना कामावर जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते. यामुळे बससेवा लवकर सुरू होणे गरजेचे आहे. 
-तुषार भंदुरे, विद्यार्थी प्रतिनिधी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com