"केरळ राज्यातील नर्सेससाठी पायघड्या कशासाठी? हा आमच्यावर अन्याय" राज्य नर्सेस संघटनेत संताप

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 27 May 2020

केरळ मदतीसाठी परिचारिका पाठविणार असेल तर त्यांचे वेतनही त्याच सरकारने दिले पाहिजे, अशी भूमिका फेडरेशनने घेतली असून, राज्य शासनाने राज्यातील बेरोजगार नर्सेसची भरती करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

नाशिक : राज्यात सुमारे 50 हजार नर्सेस रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. आरोग्य विभागात 18 हजार जागा रिक्त आहेत. असे असतानाही केरळ राज्यातील डॉक्‍टर्स आणि नर्सेसला भरघोस वेतनावर राज्याच्या आरोग्य विभागाने पाचारण केल्याने वाद उभा राहिला आहे. डॉक्‍टरसाठी दोन लाख, परिचारिकेला 30 हजार रुपये वेतन दिले जाणार असून, ही बाब राज्यातील नर्सेसवर अन्यायकारक असल्याने राज्य नर्सेस संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे. 

राज्यात केरळच्या परिचारिकांसाठी पायघड्या 
मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर, आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या दोन शहरांसाठी अतिरिक्त मनुष्यबळही उभे केल जात आहे. यासंदर्भात केरळचे डॉक्‍टर्स विदाऊट बॉर्डर्सचे उपाध्यक्ष संतोष कुमार यांनी महाराष्ट्रासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर, नर्सेस पाठविण्यासंदर्भात राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार डॉ. लहाने यांनी केरळच्या आरोग्यमंत्री श्रीमती के. के. शैलेजा यांना प्रस्ताव पाठविला आहे. यात डॉक्‍टरांना दोन लाख आणि नर्सेसला 30 हजार रुपये प्रतिमाह वेतनासह अन्य सुविधा देण्याचे नमूद केले आहे. याच पत्राने राज्यातील नर्सेसमध्ये असंतोष पसरला आहे.

राज्य नर्सेस संघटनेत संताप; 18 हजार परिचारिकांचे पदे रिक्त  

राज्यात सुमारे 50 हजार नर्सेस बेरोजगार आहेत. आरोग्य विभागात 18 हजार परिचारिकांच्या जागा रिक्त आहेत. परराज्यातील नर्सेसला रोजगार देण्याऐवजी राज्यातील बेरोजगारांना संधी देण्याची मागणी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनने केली आहे. आरोग्य विभागाकडून नवनवीन विभाग सुरू करताना भरती झालेली नाही. केरळ मदतीसाठी परिचारिका पाठविणार असेल तर त्यांचे वेतनही त्याच सरकारने दिले पाहिजे, अशी भूमिका फेडरेशनने घेतली असून, राज्य शासनाने राज्यातील बेरोजगार नर्सेसची भरती करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा > नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन

मदतीच्या हेतूने तज्ज्ञ डॉक्‍टर्स आणि नर्सेस
केरळ राज्याने मदतीच्या हेतूने तज्ज्ञ डॉक्‍टर्स आणि नर्सेस देऊ केले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने मागणी केलेली नाही. - डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय संचालक तथा राज्याचे कोरोना कक्षप्रमुख 

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात
 
केरळ राज्य डॉक्‍टर्स, नर्सेस पाठवून मदत करीत असेल, तर त्यांना भरघोस वेतन आणि सोयीसुविधा कशासाठी? केरळचे डॉक्‍टर्स, नर्सेस वेगळ्या ट्रीटमेंट करतात का? राज्यात सुमारे 50 हजार नर्सिंग बेरोजगार असून, त्यांना रोजगार न देता परराज्यातील नर्सेससाठी पायघड्या कशासाठी? हा अन्याय असून, त्याविरोधात आंदोलन केले जाईल. - इंदुमती थोरात, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशन  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State Nurses Association preparation for Movement against Injustice nashik marathi news