अर्ज भरण्याच्या नावाखाली पथविक्रेत्यांची लूट; काँग्रेस सेवादलातर्फे पंतप्रधानांना पत्र

युनूस शेख
Saturday, 19 September 2020

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या लाभाच्या अर्जासाठी पथविक्रेत्यांकडून ५० रुपये आकारण्याच्या महापालिकेच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र १०० ते २०० रुपये आकारले जात आहेत.

नाशिक/ जुने नाशिक : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या लाभाच्या अर्जासाठी पथविक्रेत्यांकडून ५० रुपये आकारण्याच्या महापालिकेच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र १०० ते २०० रुपये आकारले जात आहेत. नाशिक शहर काँग्रेसतर्फे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले असून, ज्या बॅंका लाभार्थ्यांना वेठीस धरत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

काँग्रेस सेवादलातर्फे पंतप्रधानांना पत्र

लॉकडाउनचा सर्वाधिक परिणाम असंघटित (पथविक्रेता) कामगारांवर झाला आहे. सध्यादेखील त्यांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे. अशा पथविक्रेत्यांना महापालिकेकडून पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या माध्यमातून दहा हजारांची आर्थिक मदत कर्ज स्वरूपात दिली जात आहे, याची बहुतांश नागरिकांना माहिती नाही. केवळ दहा हजारांची रक्कम मिळत आहे इतकेच त्यांना कळत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिका विभागीय कार्यालयात त्यांच्याकडून १०० ते २०० रुपये आकारणी करून अर्ज भरून घेतला जात आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेले असताना त्यांना मदत करण्यापूर्वी त्यांच्याच खिशातील रक्कम काढण्याचा प्रयत्न होत आहे. दहा हजारांवर किती व्याज आकारले जाईल, परतफेड करायची की नाही, परतफेड करायची झाल्यास किती प्रमाणात सबसिडी मिळेल याची माहिती नसल्याने मदतीच्या नावाखाली पथविक्रेत्यांची दिशाभूल होत असल्याच्या प्रतिक्रिया पथविक्रेते देत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

 

अर्ज भरण्याच्या नावाखाली पथविक्रेत्यांची लूट

केंद्र सरकारची योजना नेमकी काय आहे, पथविक्रेत्यांची अर्ज भरण्याच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबावी, तसेच योजनेचे योग्य मार्गदर्शन लाभार्थ्यांना करावे.
-डॉ. वसंत ठाकूर, शहराध्यक्ष, सेवादल

 

संपादन : रमेश चौधरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: street vendors forcefully applications nashik marathi news