शालार्थ आयडी प्रकरण : नितीन बच्छावनंतर देवीदास महाजनही निलंबित...

devidas-mahajan.jpg
devidas-mahajan.jpg

नाशिक : जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील बनावट शालार्थ आयडी प्रकरणाची विधानसभेत 11 मार्चला वादळी चर्चा झाली असताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नाशिकचे प्रभारी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला. पुण्याच्या शिक्षण आयुक्तालयातून सोमवारी (ता.16) जारी झालेल्या आदेशात श्री. बच्छाव यांच्यासमवेत जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा आताचे नाशिक महापालिकेचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनाही निलंबित करण्याचे नमूद करण्यात आले आहे.

कार्यालयात प्रकरणांच्या नसलेल्या नोंदीचा उल्लेख

बनावट स्वाक्षरीच्या आधारे शिक्षक वैयक्तिक मान्यता केल्याची तक्रार श्री. महाजन यांनी 5 नोव्हेंबर 2019 ला केली होती. त्यामध्ये शालार्थ आयडी प्रकरणाचा समावेश होता. बनावट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. नागपूरच्या अधिवेशनात पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर चौकशीचे आश्‍वासन शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. चौकशीत गैरव्यवहाराची प्रकरणे आढळल्याचे श्रीमती गायकवाड यांनी 11 मार्चला लक्षवेधीवरील चर्चेला उत्तर देताना सांगितले होते. त्याचवेळी शिक्षण विभागाने शालार्थ आयडी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. संस्थाचालकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचेही श्रीमती गायकवाड यांनी स्पष्ट केले होते. श्री. महाजन यांनी जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आणि नाशिकच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रकरणांच्या नसलेल्या नोंदीचा उल्लेख तक्रारीत केला होता. 

पदभार अन्‌ निलंबन 

श्री. बच्छाव यांना निलंबित करण्यात आल्याने श्री. महाजन यांच्याकडे शिक्षण उपसंचालकपदाचा प्रभारी पदभार दिल्याची माहिती सोमवारी शिक्षण क्षेत्रात पोचली होती. मात्र ही अफवा असल्याचे महाजन यांच्या नावाचा समावेश निलंबनाच्या आदेशात असल्याने स्पष्ट झाले. याबाबत महाजन म्हणाले, की आपल्या तक्रार अर्जाकडे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने लक्ष दिले नाही. शिक्षण विभागाचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालल्याची तक्रार आपण केली. सरकारचे नुकसान थांबले ही आपली चूक झाली काय? असा प्रश्‍न निलंबनाच्या आदेशातून माझ्यासमोर तयार झाला आहे. निलंबनाच्या आदेशात आपले नाव समाविष्ट झाल्याने त्याविरुद्ध "मॅट'मध्ये दाद मागण्याचे आपण ठरवले आहे. 

चौकशीचे पुढे काय? 

शिक्षकांची वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीप्रकरण या तक्रारींच्या अनुषंगाने नाशिक विभागातील प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केले. त्यामुळे या चौकशीचे पुढे काय? हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरित आहे. श्री. बच्छाव यांना निलंबित केल्याने जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक, तर श्री. महाजन यांना निलंबित केल्याने नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी ही तीन पदे रिक्त आहेत. या तीन पदांवर वर्णी लागावी म्हणून इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com