दादागिरी पडली महागात! शेतकऱ्याला न्याय देत व्यापाऱ्याचा परवाना निलंबित; सभापतींची कारवाई

योगेश मोरे
Monday, 2 November 2020

या व्यापाऱ्याला कुठल्याही आडतदारांनी शेतमाल देऊ नये, दिल्यास बाजार समिती कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हा प्रकार घडत असताना त्यावेळी पालेभाज्या विभागात कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी, सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांच्यावरदेखील कारवाई करणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. 

नाशिक : (म्हसरूळ) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर घेऊन आलेल्या शेतकऱ्यावर एक व्यापारी दादागिरी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावर बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी संचालक मंडळाची तात्काळ बैठक घेत संबंधित व्यापाऱ्याचा परवाना निलंबित केला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

उमराणे येथील शेतकरी अशोक देवरे हे शुक्रवार (ता. ३०) रोजी सायंकाळी १ हजार कोथिंबीर जुड्या घेऊन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन आले होते. लिलाव प्रक्रियेदरम्यान लागलेली बोली योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी देवरे यांनी कोथिंबीर न घेता परत नेण्याचा निर्णय घेतला. यावरून शेतकरी देवरे व व्यापारी मोहन खांडबहाले यांच्यात वादंग झाला. हा वाद सुरू असताना त्याचा एका शेतकऱ्याने मोबाईलवर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. सदर व्हिडिओ हा बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांच्यापर्यंत पोहचला. 

अन्यथा बाजार समिती कायद्यान्वये कारवाई 

देविदास पिंगळे यांनी तातडीने सदर प्रकरणी संचालक मंडळाची तात्काळ बैठक घेत संबंधित व्यापारी मोहन खांडबहाले यांचा परवाना निलंबित केलं असून, बाजार समिती आवारात येण्यास बंदी घातली आहे. या व्यापाऱ्याला कुठल्याही आडतदारांनी शेतमाल देऊ नये, दिल्यास बाजार समिती कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हा प्रकार घडत असताना त्यावेळी पालेभाज्या विभागात कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी, सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांच्यावरदेखील कारवाई करणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यास दमबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई केली असून, अशाप्रकारे कोणताही व्यापारी व आडत्या शेतकऱ्यावर दादागिरी करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. तशी काही तक्रार असल्यास शेतकरी वर्गाने मला संपर्क साधावा. - देविदास पिंगळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने सदर प्रकरणी व्यापाऱ्यावर केलेली कारवाई ही योग्य आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील असलेल्या प्रत्येक बाजार समितीस मी सुचवू इच्छितो की, अशाप्रकारे दादागिरी व दमबाजी प्रकार घडू नये, यासाठी बाजार समित्यांनी योग्य ते नियोजन करावे. - अशोक देवरे, शेतकरी, उमराणे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspended license trader who bullied the farmers nashik marathi news