अंत्‍यसंस्कारानंतर नातेवाईकांचे 'पीपीई किट' जातात कुठे? पुन्हा वापरले जाण्याचा संशय; वाचा सविस्तर

विक्रांत मते
Thursday, 17 September 2020

त्यामुळे तब्बल ७६ मृतदेह वेटिंगवर असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी गॅसदाहिनी तातडीने दुरुस्त करताना सोशल डिस्टन्स ठेवून लाकडावरदेखील अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली. त्यानुसार वेटिंग लिस्ट कमी होऊन मृतांवर अंत्यसंस्कार होत आहेत. 

नाशिक : कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता थेट वीजदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. अंत्यसंस्कारावेळी मृतांच्या ठराविक नातेवाईकांना पीपीई किट घालूनच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते पीपीई किट परत घेतले जातात. परंतु पुढे त्या किटचे काय होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या किट पुन्हा वापरात आणल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

सोशल डिस्टन्स ठेवून अंत्यसंस्कार करण्यास परवानगी

कोविडमुळे मृत्युमुखी पडल्यास संबंधित मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. महापालिकेच्या यंत्रणेमार्फतच अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार करताना वीजदाहिनी किंवा गॅसदाहिनीमध्ये करावे, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार महापालिकेकडे एक वीज व एक गॅसदाहिनी आहे. गॅसदाहिनी ऑगस्टच्या अखेर बंद पडली होती. त्यामुळे वीजदाहिनीवर संपूर्ण भार आला होता. वीजदाहिनीमध्ये चोवीस तासात तेरा ते चौदा अंत्यसंस्कार होतात. दीड ते दोन तासांनी एक अंत्यसंस्कार होतात. गॅसदाहिनीमध्ये चोवीस तासात आठ ते दहा अंत्यसंस्कार होतात. परंतु सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन ते चार दिवस मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत नव्हते. त्यामुळे तब्बल ७६ मृतदेह वेटिंगवर असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी गॅसदाहिनी तातडीने दुरुस्त करताना सोशल डिस्टन्स ठेवून लाकडावरदेखील अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली. त्यानुसार वेटिंग लिस्ट कमी होऊन मृतांवर अंत्यसंस्कार होत आहेत. 

किट पुन्हा वापरले जाण्याचा संशय 

महापालिकेतर्फे मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असले तरी चार ते पाच नातेवाईकांना ठराविक अंतर ठेवून उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यावेळी पीपीई किट परिधान करणे बंधनकारक आहे. त्याचा खर्च संबंधितांनाच करावा लागतो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अंगावरील पीपीई किट जागेवर काढून ठेवण्याची सक्ती केली जाते. नातेवाईकांनी पीपीई किट काढून दिल्यानंतर नियमानुसार विल्हेवाट लावणे गरजेचे असताना ते किट अमरधाममधील कर्मचारी, रुग्णवाहिकेवरील कर्मचारी काढून ताब्यात घेण्याची सक्ती करतात. पुढे त्या पीपीई किटचे काय होते, याबाबत मात्र कोणालाच माहिती नसल्याने त्या किट पुन्हा वापरात आणल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करताना होणारी वशिलेबाजी समोर आली होती. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

मूळात पीपीई किट फक्त मेडिकल वापरासाठी डॉक्टरानांच वापराची परवानगी आहे. त्यातही शासनाचे मार्गदर्शक तत्वे असून, कसे परिधान करावे, कसे काढावे यासंदर्भातदेखील नियम आहेत. नातेवाईकांना अजिबात प्रवेश दिला जात नाही. लांबूनच मृतदेहाचे दर्शन दिले जाते. त्यामुळे पीपीई किटसंदर्भात होत असलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. - डॉ. कल्पना कुटे, आरोग्य अधिकारी, महापालिका, नाशिक.  

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspicion of re-use of relatives PPE kit after funeral nashik marathi news