स्‍पर्धा परीक्षा ऑनलाइन घेण्याची चर्चा सुरू...उमेदवारांकडून निर्णयाला विरोध!

mpsc exam.jpg
mpsc exam.jpg

नाशिक : सध्याच्‍या कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर स्‍पर्धा परीक्षा ऑनलाइन स्‍वरूपात घेण्याची चर्चा सुरू असताना, उमेदवारांकडून या निर्णयाला विरोध केला जातो आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा, संयुक्त गट-ब व संयुक्त गट-क मुख्य परीक्षा ऑफलाइनच घ्याव्‍यात, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. यासंदर्भात राज्‍यपालांपासून मुख्यमंत्री
व सर्व विभागाच्या मंत्र्यांना पत्र पाठवत विनंती केली आहे. 

राज्‍यपालांपासून मंत्र्यांना पत्र 

निवेदनात म्हटले आहे, की २०१७ -१९ या कालावधीत महापरीक्षा पोर्टलमार्फत ऑनलाइन परीक्षा पद्धती राबविण्यात आली. या प्रणालीमध्ये खासगी कंपनीला कंत्राट दिल्यामुळे परीक्षा पद्धतीत पारदर्शकता, तत्परता आणि विश्वसनीयता याचा अभाव दिसून आला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्‍यांना सामोरे जावे लागले. ऑफलाइन पद्धतीत कार्बनप्रत मिळत असल्याने विद्यार्थ्यांकडे त्याबाबतचा पुरावा मिळतो. परंतु ऑनलाइन पद्धतीत पुरावा मिळणार नाही. परीक्षेदरम्यान कॉम्प्युटरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्‍यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. 

संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजपर्यंत ऑफलाइन परीक्षा पद्धतीची सवय असल्याने अचानकपणे ऑनलाइन परीक्षा पद्धत राबविल्‍यास ग्रामीण
विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. आजपर्यंत आयोगाने प्रश्नांचा दर्जा उच्च ठेवला असून, ऑनलाइन पद्धतीमध्ये हा दर्जा उच्च राहीलच का याबाबत अभ्यासू व प्रामाणिक कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांत संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण असल्‍याचे पत्रात नमूद केले आहे. 

धांदल उडण्याची शक्यता 

विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षेच्या दृष्टिकोनातून कागदी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेवर सराव करून अभ्यास केला असून, अचानकपणे अशा पद्धतीने ऑनलाइन परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांची धांदल उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुद्द्यांचा विचार करता स्‍पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दिलासा देत ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com