गुरुजींवर आता ग्रामपंचायतीची शाळा चालवण्याचीही जबाबदारी

TEACHER.jpg
TEACHER.jpg

नाशिक / येवला : कायदेशीर अडचण नको म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने सावध पवित्रा घेत जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. शुक्रवारी (ता. १४) रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील ४९३ ग्रामपंचायतींना प्रशासकीय सरपंच मिळाले असून, यामुळे गेल्या महिन्यापासून रेंगाळलेल्या कामकाजाला गती मिळणार आहे. विशेष म्हणजे, शिक्षण विभागाच्या विस्ताराधिकाऱ्यांसह केंद्रप्रमुखांवरही सरपंचपदाची जबाबदारी दिली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ४९३ ग्रामपंचायतींना मिळाले प्रशासकीय सरपंच
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका ‘कोरोना’मुळे पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपलेल्या १०२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणूक झाली आहे. तर जुलैत ३७, ऑगस्टमध्ये ४५९, सप्टेंबरमध्ये दोन, ऑक्टोबरमध्ये दहा, नोव्हेंबरमध्ये एक, डिसेंबरमध्ये दहा, अशा एकूण ५१९ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ठिकाणी प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे अधिकार शासनाने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. त्यात मध्यंतरी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य व्यक्तीची म्हणजे गावपुढाऱ्याची नियुक्ती करण्याच्या हालचाली झाल्या. परंतु पुन्हा न्यायालयाने अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिल्याने विस्ताराधिकारी व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्यभर होत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या नियुक्त्या मुदत संपूनही रेंगाळल्याने अडचण काय, असा प्रश्‍न सुरू असताना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आदेश काढल्याने ग्रामपंचायतींना अखेर प्रशासकीय सरपंच मिळाले आहेत.
रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी याबाबतचे आदेश पारित करत होते.

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले

जुलैमधील ३९ व ऑगस्टअखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या ४५४ अशा एकूण ४९३ ग्रामपंचायतींवर विविध अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. यामध्ये येवल्यातील ३९, मालेगावमधील ९९, सिन्नरमधील ९८, दिंडोरीतील सात, इगतपुरीत दोन, चांदवडच्या ५२, देवळ्यात नऊ, त्र्यंबकेश्‍वरमध्ये दोन, नांदगावमध्ये ५९, नाशिकमध्ये २५, निफाडला ६२, बागलाणमध्ये ३९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. ग्रामपंचायतीवर त्या-त्या तालुक्यातील कृषी, शिक्षण, आरोग्य, सांख्यिकी विभागाचे विस्ताराधिकारी, तसेच कृषी अधिकारी, प्रशासन अधिकारी, पर्यवेक्षिका शाखा अभियंता व काही ठिकाणी केंद्रप्रमुखाची देखील नियुक्ती झाली असून, मोठ्या ग्रामपंचायतींची जबाबदारी सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांवरही दिली गेली आहे.
 

मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर बाबी तपासूनच सर्व नेमणुका झाल्या आहेत. नेमणूक आदेशापासूनच प्रशासक कारभार पाहणार असून, नवे सदस्य अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक असतील. सर्व नियमांच्या चौकटीतच प्रशासकांना काम करावे लागणार आहे. जुलै व ऑगस्ट अखेरपर्यंतच्या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती केली आहे.-रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक 
--

संपादन - ब्रिजकुमार परिहार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com