विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शिक्षकांसाठी डोकेदुखी! कार्ड अपडेटला ओटीपीचा अडसर

राजेंद्र दिघे
Monday, 9 November 2020

आधारच्या केंद्रांची संख्या घटल्याने संबंधित ठिकाणी जाण्यासाठी वेळ काढणे पालकांना शक्य होत नाही. अशावेळी अनेक अडचणींसह तांत्रिक बाबी या आधारकार्डमध्ये शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेक गुरुजी स्वखर्चाने आधार काढून समाजहित जोपासत आहेत. 

मालेगाव कॅम्प (नाशिक ) : प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शंभर टक्के आधारकार्ड सक्तीचे केले आहेत. शासनाचा उद्देश स्वच्छ असला, तरी याचा फटका मात्र सध्या शिक्षकांना बसत आहे. कारण जुने नोंदणी केलेल्या अनेक मुलांनी अंगणवाडीतच आधार नोंदणी केली. मात्र वेळेत पोस्टाने कार्ड न मिळाल्याने पालकांचे दुर्लक्ष झाले. तर वंचित, मोलमजुरी करणाऱ्या पालकांकडून पाल्यांचे आधारकार्ड काढण्यास होणारी दिरंगाई शिक्षकांना त्रासदायक ठरत आहे. 

कार्ड अपडेटला ओटीपीचा अडसर 
कार्ड अपडेट करण्यात मोबाईल नंबर बदलल्याने अडचणी येतात. ओटीपी जुन्या नंबरला जातो. ओटीपीअभावी अपडेट अपूर्ण राहाते. परिणामी आधारकार्डचे घोंगडे भिजतच राहते. पालकांपेक्षा शिक्षकांनी आपल्या वर्गाचे आधारकार्ड पूर्ण होण्याकडे लक्ष द्यावे, अशीच परिस्थिती आहे. आधारच्या केंद्रांची संख्या घटल्याने संबंधित ठिकाणी जाण्यासाठी वेळ काढणे पालकांना शक्य होत नाही. अशावेळी अनेक अडचणींसह तांत्रिक बाबी या आधारकार्डमध्ये शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अनेक गुरुजी स्वखर्चाने आधार काढून समाजहित जोपासत आहेत. 

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

आधारकार्डाची कटकट मात्र कायम
मालेगाव शहरालगतच्या गावांमध्ये मजूर वर्गाचे प्रमाण मोठे असल्याने संबंधित मजूर जिल्ह्याबाहेरून येऊन स्थायिक होतात. त्यांच्याकडे आधार संलग्न रहिवासी तत्सम संबंधित ओळखपत्र कुठलाही पुरावा नसल्याने त्यांच्या पाल्यांचे नाव शाळेत दाखल असले तरी आधारकार्डाची कटकट मात्र कायम राहते. 

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

पालकांच्या अडचणी बघता आधारकार्डबाबत शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दिवस व आधार केंद्र देण्याची गरज आहे. परिसरातील केंद्राचे नियोजन केल्यास ते सोयीस्कर ठरणार आहे. - राजेंद्र लोंढे, विभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती 

आधारकार्ड अपडेट करताना नोंदणी केलेल्या, ठसे उमटवणेवेळी दिलेला मोबाईल आज बदलला असेल, तर अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी नवीन आधार नोंदणीचा पर्याय आहे. आम्ही विद्यार्थ्यांना प्राधान्याने सहकार्य करतो. - युवराज आहेर, आधार केंद्र, जळगाव निं. 

विद्यार्थी आधारकार्डची 
तालुकानिहाय टक्केवारी 

बागलाण ९०.६० 
चांदवड ९३.९५ 
देवळा ९१.९८ 
दिंडोरी ९२.७४ 
इगतपुरी ९१.५२ 
कळवण ९०.३७ 
मालेगाव ८३.०५ 
नांदगाव ९१.४३ 
नाशिक ९२.५९ 
निफाड ९१.७३ 
पेठ ९३.९४ 
सिन्नर ९१.३३ 
सुरगाणा ८९.९१ 
त्र्यंबकेश्वर ८६.६५ 
येवला ९०.१७ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers suffer from student Aadhaar card nashik marathi news