'धरणाला पडले भगदाड...तरीही पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षच!'..ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

धरण बांधल्यापासून त्याकडे पाटबंधारे विभागाने कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे धरणाच्या देखभाल आणि दुरूस्तीचा विसरच विभागाला पडला. अखेर 33 वर्षानंतर 2019 साली या बोरखिंड या धरणाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. गेल्या वर्षीही जून महिन्यात धरणाच्या भरावाला अचानक मोठे भगदाड पडले​

नाशिक/पांढुर्ली : शिवडेसह विंचुरीदळवी, पांढुर्ली, सावतामाळीनगर, घोरवड, बोरखिंड या सर्व गावांना शेती व पिण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सिन्नर तालुक्‍यातील दुसऱ्या क्रमांकाच्या या धरणाच्या बांधकामाला तीन मोठ्या आकाराची भगदाडे पडली आहेत. धरणाला पडलेल्या या मोठ्या तीन भगदाडांमुळे हे धरण फुटण्याची भिती यावेळी येथील गावकऱ्यांनी व्यक्त करत पावसाळ्यापूर्वी या धरणाच्या भगदाडांच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जीवित अन्‌ वित्तहानीची भीती

सिन्नर तालुक्‍यातील बोरखिंड येथे 1986 मध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. यामुळे शिवडेसह विंचुरीदळवी, पांढुर्ली, सावतामाळीनगर, घोरवड, ही गावे सिंचनाखाली आली. मात्र धरण बांधल्यापासून त्याकडे पाटबंधारे विभागाने कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे धरणाच्या देखभाल आणि दुरूस्तीचा विसरच विभागाला पडला. अखेर 33 वर्षानंतर 2019 साली या बोरखिंड या धरणाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. गेल्या वर्षीही जून महिन्यात धरणाच्या भरावाला अचानक मोठे भगदाड पडले. यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी तातडीने पाटबंधारे विभागाला विभागाला कळविले; परंतु नेहमीप्रमाणे विभागाने देखील दुर्लक्ष केल्याने अखेर आपल्या या धरणाची गरज असल्याचे मानून ग्रामस्थांनी समृद्धी महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या मशिनद्वारे धरणाचे काम करून घेतले. त्यानंतर पाटबंधारे विभागाने आपणच ते भगदाड बुजविल्याचा बोलबाला केला. तीस टक्के पाणीसाठा असलेल्या याच धरणातून आजही समृद्धी महामार्गासाठी माती उपसा होत आहे. या माती उपशामुळे पाणीसाठा धरणाची पाणी साठवण क्षमता नक्कीच वाढणार आहे. मात्र यामुळे धरणाच्या भिंतीवर अधिक मोठा दाब पडून धरण फुटून जीवित अन्‌ वित्तहानीची भीती यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार

पदरी नेहमीच निराशा...

दहा वर्षांपासून ग्रामस्थांनी धरणाच्या दुरूस्तीकरीता शासकीय आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवून काहीही उपयोग झाला नाही. आश्‍वासनांव्यतिरिक्त काहीही पदरी पडले नाही. त्यामुळे बोरखिंडची ग्रामसभा घेऊन ग्रामसभेचा ठराव पाटबंधारे विभागाला देण्याचा निर्णय झाला आहे. यावेळी गावांमधील ग्रामस्थांनी तहसीलदार, सिन्नर पाटबंधारे विभाग, सिन्नर आणि जिल्हा पाटबंधारे विभाग यांना ग्रामसभेद्वारे घेतलेल्या निर्णयाची प्रत प्रत्यक्ष भेटून देण्याचा निर्णय झाला. या धरणाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागासह सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे.

हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three big cracks fell on the dam; Fear of dam burst nashik marathi news