COVID-19 : 'पॉलिहाउसमधील गुलाबाचं करायचं तरी काय?'...शेतकरी झाला हवालदिल

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

नाशिक शहराची ओळख फुलांचे शहर अशी जरी असली तरी कोरोना व्हायरसने देशात घातलेल्या थैमानामुळे फुलांची शेती करणारे शेतकरी धास्तावले असून, त्यांच्यावर हजारो फुलांचे बंडल फेकून देण्याची वेळ आली आहे. राज्यात लागू करण्यात आलेल्या 144 कलमामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर दैनंदिन व्यवहार बंद केल्याने पॉलि हाउसमधील गुलाबाचे करायचे काय? असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

नाशिक : नाशिक शहराची ओळख फुलांचे शहर अशी जरी असली तरी कोरोना व्हायरसने देशात घातलेल्या थैमानामुळे फुलांची शेती करणारे शेतकरी धास्तावले असून, त्यांच्यावर हजारो फुलांचे बंडल फेकून देण्याची वेळ आली आहे. राज्यात लागू करण्यात आलेल्या 144 कलमामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर दैनंदिन व्यवहार बंद केल्याने पॉलिहाउसमधील गुलाबाचे करायचे काय? असा प्रश्‍न उभा राहिला आहे. 

15 दिवसांचे नुकसान एका एकराला 40 हजारांच्या आसपास

नाशिक जिल्ह्यात जानोरी, मोहाडी, आडगाव आदी परिसरात दीडशे एकरमध्ये गुलाबाच्या बागा आणि पॉलिहाउस असून, शेतकऱ्यांनी मोठे कर्ज काढून ती बांधली आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने गुलाबाला मागणीच राहिली नाही. मुंबईमध्ये जाणारा मार्गदेखील बंद झाल्याने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. फुले नाशवंत असून, दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाहीत. एका पॉलिहाउसमधून दोन दिवसांआड दीडशे बंडल निघतात. एक फूल किमान अडीच रुपये धरले तरी दिवसाचे साडेचार हजार आणि 15 दिवसांचे नुकसान एका एकराला 40 हजारांच्या आसपास होत आहे. या परिसरात दीडशे एकर गुलाब असल्याने तब्बल साठ लाखांचे नुकसान 15 दिवसांत होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांचे कोरोना मुळे कंबरडे मोडले असून, आता पैसे भरायचे कसे, असा प्रश्‍न उभा राहत आहे. गुलाबा बरोबर झेंडू, शेवंती, निशिगंध, लीली, गेलडा, मोगरा आदी फुलांचे उत्पादक शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. 

Image may contain: plant, flower, nature and outdoor

दृष्टिक्षेपात नुकसान 

-एक एकरमध्ये दिवसाआड निघतात 150 बंडल 
-एका फुलाची किंमत अडीच रुपये 
-तीन गावांत दीडशे एकर गुलाब 
-150 X 12 X 2.50 = 4500 प्रतिदिन उत्पन्न 
-4500 X 10 = 45000 दहा दिवसांचे उत्पन्न 
-45000 X एकर 150= 67,50,000 इतके नुकसान 
(ही आकडेवारी तीन गावांतील अंदाजित आहे.) 

हेही वाचा > ''कोरोना कळतो हो साहेब, पण या शेतमालाचं काय?''...शेतकऱ्यांची परिस्थितीशी झुंज सुरुच

मी उच्च शिक्षण घेतल्यानंतर मोठी नोकरी न करता फुलशेती करण्याचे ठरविले. गावाजवळ असणाऱ्या एक एकरमध्ये गुलाब लावला. प्रयोग यशस्वी झाला. पॉलिहाउस साठी अनेकांनी कर्ज घेतले आहे. आता कोरोनामुळे फुले विकण्याचा सर्व मार्ग बंद झाला आहे. फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. - उत्तम ढारबाळे, फूल उत्पादक, आडगाव  

हेही वाचा> संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार - छगन भुजबळ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time to throw the product on the road; Millions were damaged nashik marathi news