पोषण महिना अभियान : लोकसहभागात नाशिक राज्यात अव्वलस्थानी 

महेंद्र महाजन
Thursday, 8 October 2020

देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे गेल्या महिन्यात पोषण महिना अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत देशामध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर राज्यात लोकसहभागामध्ये नाशिक अव्वलस्थानी राहिले. चार प्रकारांमध्ये नाशिकने पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे. 

नाशिक : देशातील कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे गेल्या महिन्यात पोषण महिना अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत देशामध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर राज्यात लोकसहभागामध्ये नाशिक अव्वलस्थानी राहिले. चार प्रकारांमध्ये नाशिकने पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे. 

लोकसहभागात नाशिक राज्यात अव्वलस्थानी 
कुपोषण नियंत्रणासाठी जनजागृती करणे, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना पोषण आहार उपलब्ध करणे हा उद्देश अभियानामागील होता. अभियान सुरू करण्यापूर्वी बिहार, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये ४० टक्के मुले कुपोषित असल्याचे आणि झारखंडमध्ये ६५ टक्के महिलांमध्ये ॲनेमियाची समस्या असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे एकीकडे कोरोना विषाणू संसर्ग आपत्तीला सामोरे जात असताना अंगणवाड्यांच्या माध्यमातून अभियान प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न महिला व बालकल्याण विभागातर्फे नेण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांच्यासह क्षेत्रीय यंत्रणेने अभियान जिल्ह्यात लोकांच्या सहभागातून यशस्वी होण्यावर लक्ष केंद्रित केले होते. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

पुणे जिल्ह्याचीही कामगिरी 
जनआंदोलन डॅशबोर्ड या प्रकारामध्ये एकूण उपक्रमात पुणे अव्वलस्थानी राहिले. पुणे जिल्ह्यात अंगणवाड्यांच्या माध्यमातून ८३ लाख ३६ हजार ९७७ उपक्रम राबविण्यात आले. नाशिक जिल्ह्यात ८० लाख २६ हजार ६५३, कोल्हापूरमध्ये ७९ लाख ४६ हजार ८०५, धुळे जिल्ह्यात ५८ लाख ५३ हजार ३९३, तर ठाणे जिल्ह्यात ४१ लाख २२ हजार ८०२ उपक्रम राबविण्यात आले. नाशिक जिल्ह्यात चार हजार अंगणवाड्या आहेत. त्या माध्यमातून महिनाभर राबविण्यात आलेल्या उपक्रमात १० कोटी २१ लाख तीन हजार ३५३ जिल्हावासीयांचा सहभाग राहिला. राज्यात तो सर्वाधिक आहे. त्याखालोखाल धुळे जिल्ह्यात सहा कोटी ७० लाख ८६ हजार ६१२, पुणे जिल्ह्यात सहा कोटी ७६ हजार ३९९, कोल्हापूरमध्ये पाच कोटी ९१ लाख ७० हजार ५६२, नागपूरमध्ये चार कोटी सात लाख ६८ हजार ६९७ जणांचा अंगणवाड्यांच्या उपक्रमात सहभाग होता. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

धुळे दोन प्रकारांमध्ये प्रथम 
उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे, अंगणवाडीनिहाय उपक्रम आणि त्यातील लोकसहभाग अशा दोन प्रकारांमध्ये धुळे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. प्रत्येक अंगणवाडीत दोन हजार ५६२ उपक्रम राबविण्यात आले आणि प्रत्येक अंगणवाडीमागे २९ हजार ३६० जणांचा सहभाग हे वैशिष्ट्य धुळे जिल्ह्याचे राहिले. अंगणवाडीनिहाय दोन हजार १२६ उपक्रम भंडारा, एक हजार ८१९ उपक्रम कोल्हापूर, एक हजार ४११ उपक्रम नाशिक, तर एक हजार ३८० उपक्रम पुणे जिल्ह्यात राबविण्यात आले. प्रत्येक अंगणवाडीच्या उपक्रमातील लोकसहभागात २० हजार ८८२ जणांचा भंडारा, १७ हजार ९४८ जणांचा नाशिक, १३ हजार ५४३ जणांचा कोल्हापूर, तर ११ हजार ९७७ जणांचा नागपूर जिल्ह्यात सहभाग होता. 

देशात महाराष्ट्राने मिळवलाय प्रथम क्रमांकाचा मान 

कुपोषण निर्मूलनाच्या दिशेने नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून विविध उपक्रम राबविण्यात येताहेत. गावस्तरावरील लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने महिला व बालकल्याण, आरोग्याच्या जोडीला ग्रामपंचायतींचे योगदान मिळाले आहे. प्रतिकूल परिस्थितीत आशा आणि अंगणवाडी कर्मचारी व इतर विभागांनी खूप चांगले काम केल्याने राज्यात चांगली कामगिरी जिल्ह्याला करता आली. -लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद 

 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Top in public participation in Nashik state marathi news