सिव्हिलमधील रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन लंपास; कंत्राटी कर्मचाऱ्यासह दोघांवर गुन्‍हा

अरुण मलाणी
Tuesday, 13 October 2020

गंभीर प्रकृती असलेल्‍या कोरोनाबाधितांना उपचाराचा भाग म्‍हणून रेमडेसिव्हिर इंजेक्शन द्यावे लागते. रुग्ण संख्येसोबत इंजेक्‍शनला मागणी वाढल्‍याने इंजेक्शनचा काही काळासाठी तुटवडा निर्माण झाला होता.

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्‍या कोविड कक्षातील शासकीय कोट्यामधील रेमडेसिव्हिर इंजेक्शन लंपास करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यासह त्‍याच्‍या साथीदाराविरोधात गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटी कर्मचाऱ्याला अटकदेखील केली आहे. अटक केलेल्‍या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव दीपक गणेश सातपुते असून, त्‍याचा मित्र कार्तिक किशोर सोनार (रा. ता. राहता, जि. नगर) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

गंभीर प्रकृती असलेल्‍या कोरोनाबाधितांना उपचाराचा भाग म्‍हणून रेमडेसिव्हिर इंजेक्शन द्यावे लागते. रुग्ण संख्येसोबत इंजेक्‍शनला मागणी वाढल्‍याने इंजेक्शनचा काही काळासाठी तुटवडा निर्माण झाला होता. जिल्‍हा रुग्णालयातील कोविड कक्षात कंत्राटी स्‍वरूपात कार्यरत सातपूतेने शासकीय कोट्यातील इंजेक्शनचा अपहार केल्‍यानंतर, इंजेक्शन परस्पर रुग्णालयाबाहेरील रुग्णाच्या नातलगांना विक्री केल्याचा धक्‍कादायक प्रकार निदर्शनास आला होता. या प्रकरणातील सखोल चौकशीनंतर दीपकसह त्याचा मित्र कार्तिकविरोधात औषध निर्माण अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणी तपास पोलिसांकडून सुरू असून, आणखी कोण या प्रकारात सहभागी आहे, याचा शोध घेतला जात आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two accused have been booked for stealing a remdesevir injection nashik marathi news