नाशिककरांनो सावध रहा, अन्यथा दंडच! डेंगी उत्पत्ती आढळल्यास वैद्यकीय विभागाकडून कारवाई

विक्रांत मते
Sunday, 22 November 2020

साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. परंतु डेंगीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांची साथही गरजेची असल्याने त्यादृष्टीने महापालिकेने शनिवारी (ता. २१) नाशिककरांना जाहीर आवाहन करताना डेंगी उत्पत्तीची स्थळे नष्ट करण्याच्या सूचना दिल्या.

नाशिक : दिवाळीनंतर शहरात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता दिसत असताना बदलत्या हवामानानुसार साथीच्या किंवा डेंगीच्या आजारांनी तोंड वर काढण्यास सुरवात केल्याने वैद्यकीय विभागाने डेंगी उत्पत्ती आढळणाऱ्या ठिकाणांवर कारवाई करताना संबंधितांना दोनशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला असून, डेंगी उत्पत्तीची स्थाने शोधण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.

नागरिकांची साथही गरजेची

यंदा कोरोना संसर्गाच्या साथीने संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच पारंपरिक साथीचे आजार व डेंगीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. परंतु डेंगीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांची साथही गरजेची असल्याने त्यादृष्टीने महापालिकेने शनिवारी (ता. २१) नाशिककरांना जाहीर आवाहन करताना डेंगी उत्पत्तीची स्थळे नष्ट करण्याच्या सूचना दिल्या. ड्रम, टाकी, रांजणमाठ, वॉटर कूलरमधील पाणी, नारळाच्या करवंट्या, टायर, डबे, रिकाम्या कुंड्या, बादल्या, फ्रीजमागील ट्रे, हौद, फुलदाणी, झाडांच्या कुंड्या, पक्षी, प्राणी पाणवठे, टायर, भंगार वस्तू, घरांचे छत, दार व खिडकीवरील सज्जा, बाल्कनी, बांधकामावरील पाण्याचे उघडे साठे आदी अडचणीच्या भागात पाणी साचणार नाही, याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

नागरिकांकडून निष्काळजीपणा

डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासंदर्भात सूचना देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास मदत होत आहे. त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या नागरिकांच्या घरात व परिसरात तसेच संस्था व परिसरात पाणीसाठ्याची योग्य काळजी घेतली जाणार नाही व त्यामध्ये डेंगी डासांची उत्पत्ती आढळल्यास बेजबाबदार नागरिक, संस्थांना दोनशे रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रम, टाकी, रांजणमाठ, वॉटर कूलरमधील पाणी, नारळाच्या करवंट्या, टायर, डबे, रिकाम्या कुंड्या, बादल्या, फ्रीजमागील ट्रे, हौद, फुलदाणी आदी ठिकाणाचे पाणी दर आठवड्याला बदलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred rupees will be fined for negligence in dengue nashik marathi news